युक्रेनला इंटरनेट पुरविणाऱ्या स्टारलिंक सॅटेलाईट नेटवर्कवर रशियाचे सायबरहल्ले

- उद्योजक एलॉन मस्क यांचा आरोप

वॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनला इंटरनेट पुरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘स्टारलिंक नेटवर्क’वर रशियाकडून मोठ्या प्रमाणात सायबरहल्ले होत असल्याचा आरोप उद्योजक एलॉन मस्क यांनी केला. फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांनंतर युक्रेनने मस्क यांच्याकडे ‘सॅटेलाईट इंटरनेट’ची मागणी केली होती. त्यानुसार मस्क यांनी युक्रेनला ‘स्टारलिंक नेटवर्क’च्या माध्यमातून सेवा देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रशियाच्या अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी मस्क यांच्यावर ‘मिलिटरी कम्युनिकेशन’शी निगडीत यंत्रणा पुरविल्याचा आरोप करून त्याच्या परिणामांसाठी तयार राहण्याचा इशाराही दिला होता.

रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद सायबरक्षेत्रातही उमटले होते. रशियासमर्थक हॅकर्सच्या गटांनी संघर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच युक्रेनच्या इंटरनेट नेटवर्कवर हल्ले सुरू केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून जागतिक स्तरावरील हॅकर्सचा सर्वात मोठा गट असणाऱ्या ‘ॲनॉनिमस’ने रशियाच्या विरोधात सायबरयुद्धाची घोषणा केली होती. ‘ॲनॉनिमस’ने सुरू केलेल्या सायबरहल्ल्यांविरोधात ‘किलनेट’ असे नाव असणाऱ्या रशियन हॅकर्सच्या गटाने प्रतिहल्ले चढविले होते. युक्रेनने जगभरातील हॅकर्सना रशियाविरोधात आघाडी उघडण्याचे आवाहनही केले होते.

रशियाने चढविलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या दूरसंचार व संपर्कयंत्रणेची मोठी हानी झाली होती. त्यामुळे देशातील इंटरनेट सुरळीत ठेवण्यासाठी युक्रेन सरकारने एलॉन मस्क यांना ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा पुरविण्याची विनंती केली होती. या विनंतीनुसार, मार्च महिन्यापासून मस्क यांनी युक्रेनसाठी ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा सुरू केली होती. त्यानुसार, युक्रेन सरकार व जनतेसह युक्रेनच्या लष्करालाही इंटरनेटची सुविधा पुरविण्यात आली होती. मस्क यांनी युक्रेनला पुरविलेल्या इंटरनेटच्या सुविधेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

रशियाच्या अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी काही दिवसांपूर्वी मस्क यांना इशारा दिला होता. मस्क यांच्या ‘स्टारलिंक नेटवर्क’ची सेवा अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या माध्यमातून युक्रेनला पुरविण्यात येत आहे. मस्क युक्रेनमधील फॅसिस्ट शक्तींना सहाय्य करीत आहे व याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा रोगोझिन यांनी दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मस्क यांनी, युद्धात देवदूत नसतात असे ट्विट केले होते. त्यानंतर, उद्या माझा संशयास्पदरित्या मृत्यू झाला तर त्यामागे कोण असेल याची माहिती असणे उत्तम ठरेल, असा टोलाही एलॉन मस्क यांनी लगावला होता.

यापूर्वीही मस्क व रशिया सरकारदरम्यान खटके उडाल्याचे समोर आले आहे. मस्क यांच्या ‘स्पेसेक्स’ कंपनीकडून वापरण्यात येणारे तंत्रज्ञान व त्यांच्याकडून सोडण्यात येणारे उपग्रह तसेच इतर योजनांवर रशियाने आक्रमक प्रतिक्रिया दिल्या होत्या. एलॉन मस्क यांच्या ‘ट्विटर’ खरेदी करण्याच्या योजनेचीही रशियाने खिल्ली उडविली होती.

leave a reply