संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिकेचा उत्तर कोरियावर निर्बंधांचा नवा प्रस्ताव

- चीन व रशियाचा विरोध

न्यूयॉर्क – क्षेपणास्त्र चाचण्यांचा सपाटा लावणाऱ्या आणि अणुचाचणीच्या तयारीत असलेल्या उत्तर कोरियामुळे या क्षेत्रातील स्थैर्य व सुरक्षा बाधित होत आहे. त्यामुळे उत्तर कोरियावर नवे कठोर निर्बंध लादावे, असा प्रस्ताव अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर मांडला. पण उत्तर कोरियावर निर्बंधांची कारवाई आवश्यक नसल्याचे सांगून चीनने अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावला. त्यापाठोपाठ रशियाने देखील उत्तर कोरियावरील नव्या निर्बंधांना विरोध केला.

अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडे उत्तर कोरियाबाबत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती. बुधवारी ही बैठक पार पडली. यात अमेरिकेच्या राष्ट्रसंघातील राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर जोरदार टीका केली. ‘गेल्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरिया करीत असलेल्या क्षेपणास्त्र चाचण्या सुरक्षा परिषदेच्या नियमांमध्ये बसणाऱ्या नाहीत. या चाचण्या उघडपणे शेजारी देशांना धमकावणाऱ्या ठरत आहेत’, असे ताशेरे राजदूत लिंडा यांनी ओढले. अमेरिकेचे बायडेन प्रशासन उत्तर कोरियाबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण त्याआधी उत्तर कोरियाने आपल्या कारवाया आणि क्षेपणास्त्र चाचण्या त्वरीत थांबवाव्या, असे अमेरिकेच्या राजदूतांनी फटकारले. सुरक्षा परिषदेनेही उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कारवायांवर मौन बाळगण्याचे थांबवावे, असे आवाहन राजदूत लिंडा यांनी केले. उत्तर कोरिया चर्चेचा प्रस्ताव स्वीकारेल, अशी अपेक्षा अमेरिकेच्या राजदूतांनी व्यक्त केली. तर उत्तर कोरियन हुकूमशहांशी संपर्कात असणाऱ्यांनी देखील राजनैतिक वाटाघाटीसाठी प्रयत्न करावे, असे सांगून लिंडा यांनी चीनला टोला लगावला.

चीनने उत्तर कोरियावर नवे निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावावर सडकून टीका केली. 2018 साली उत्तर कोरियाने अमेरिकेकडे प्युंगे-री अणुप्रकल्प मोडीत काढून अण्वस्त्रप्रसारबंदीसाठी प्रयत्न केले होते, याची आठवण सुरक्षा परिषदेतील चीनच्या राजदूतांनी केली. पण अमेरिकेनेच उत्तर कोरियाच्या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नव्हता, असा ठपका चीनने ठेवला. अमेरिका उत्तर कोरियावर विश्वास ठेवायला तयार नसल्याची टीका चीनने केली. रशियाने देखील उत्तर कोरियावर आत्तापर्यंत लादलेल्या निर्बंधांना विरोध केला.

उत्तर कोरियावरील निर्बंधांचा प्रस्ताव नाकारणारे चीन व रशिया उत्तर कोरियाच्या हुकूमशाहीच्या कारवायांना प्रोत्साहन देत असल्याची टीका अमेरिकेने केली. 31 मे पर्यंत सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे. त्याआधी पुन्हा एकदा उत्तर कोरियावरील निर्बंधांचा प्रस्ताव सादर करण्ाार असल्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत.

गेल्या चार महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने 17 क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या असून यामध्ये तीन आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेच्या अतिपूर्वेकडील शहरांवर हल्ला चढविण्याची क्षमता असलेले क्षेपणास्त्र देखील होते. गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने लष्करी संचलनात ही क्षेपणास्त्रे प्रदर्शित केली होती. तसेच हुकूमशहा किम जाँग-उन यांनी लवकरच अणुचाचणी केली जाईल, अशी घोषणा केली होती.

दरम्यान, दक्षिण कोरियाच्या सत्तेवर आलेले नवे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी उत्तर कोरियाचा धोका लक्षात घेऊन आपला देश अमेरिकन संरक्षणदलांच्या नव्या तैनातीसाठी प्रयत्न करील, असे संकेत दिले आहेत. तसेच भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ संघटनेत सामील होण्याची तयारी दक्षिण कोरिया करीत असल्याच्या बातम्या या देशातील माध्यमे देत आहेत. यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ बनला असून उत्तर कोरियाच्या आक्रमकतेमागे चीनची अस्वस्थता असावी, अशी दाट शक्यता समोर येत आहे.

leave a reply