पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे रशियाची अन्नधान्यांची निर्यात बाधित

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को – युक्रेनवर हल्ले चढवून रशिया जगभरात गंभीर उपासमारीचे संकट निर्माण करीत असल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देशांनी केला होता. पण पाश्चिमात्यांनीच रशियावर युक्रेनचे युद्ध आणि त्यानंतरचे निर्बंधे लादले आहेत, असा ठपका रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ठेवला आहे. पाश्चिमात्यांनी हे निर्बंध उठविले तरच रशिया खत आणि अन्नधान्यांची निर्यात करू शकेल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन म्हणाले. तर जागतिक अन्नसंकटाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी युक्रेन आणि पाश्चिमात्यांवर असल्याची आठवण रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी करुन दिली.

पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे रशियाची अन्नधान्यांची निर्यात बाधित - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनरशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. रशिया युक्रेनवरील आपली पकड मजबूत करीत चालल्याचा दावा केला जातो. रशियन लष्कर युक्रेनच्या अन्नधान्याच्या कारखान्यांच्या दिशेने पुढे सरकत असल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनमधील या अन्नधान्याच्या कोठारांवर ताबा मिळवून रशिया युक्रेनसह आफ्रिकी तसेच काही आशियाई देशांची कोंडी करीत असल्याचा आरोप पाश्चिमात्य देशांमधून केला जात आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या जागतिक अन्नसंकटासाठी रशिया कारणीभूत असल्याची टीका सुरू झाली आहे.

अशा परिस्थितीत, सोमवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांच्यात फोनवरुन चर्चा पार पडली. यात रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी निर्बंधावरील मुद्दा उपस्थित केला. रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या युक्रेनच्या पूर्वेकडील बंदरांद्वारे अन्नधान्याची निर्यात सुरू होऊ शकतो. यामुळे यावर अवलंबून असलेल्या देशांची कोंडी फुटू शकते, याकडे रशियन राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले. पण त्यासाठी पाश्चिमात्य देशांना रशियावरील निर्बंध मागे घ्यावे लागतील, असा प्रस्ताव रशियन राष्ट्राध्यक्षांनी ठेवला.

पाश्चिमात्यांच्या निर्बंधांमुळे रशियाची अन्नधान्यांची निर्यात बाधित - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनपाश्चिमात्यांच्या धोरणांमुळेच जगभरात अन्नधान्यांची टंचाई भेडसावते आहे, असा आरोप रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. पाश्चिमात्यांनी रशियावरील निर्बंध उठविले तर रशिया खतांचीही निर्यात सुरू करील, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. तर आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेले रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी देखील जगभरातील अन्नसंकटासाठी युक्रेन व पाश्चिमात्य देश जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. युक्रेन व पाश्चिमात्य देशांना वाटत असेल तर जगावरील अन्नसंकट दूर होऊ शकते, अशा शब्दात लॅव्हरोव्ह यांनी अमेरिका व युरोपिय देशांना लक्ष्य केले.

दरम्यान, जागतिक गव्हाच्या एकूण निर्यातीपैकी रशिया आणि युक्रेन ‘ब्लॅक सी’ मधून 29 टक्के गव्हाची निर्यात करतात. तसेच युक्रेन मोठ्या प्रमाणावर मक्याची देखील निर्यात करतो. सध्या युक्रेनच्या बंदरावर दोन कोटी 20 लाख टन अन्नधान्य पडून असल्याचा दावा केला जातो.

leave a reply