सामूहिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील – संयुक्त राष्ट्रसंघात भारताची चिंता

संयुक्त राष्ट्रसंघ – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उदयामुळे सामूहिक संहार घडवून आणणारी शस्त्रे दहशतवादी संघटना किंवा नॉन स्टेट ॲक्टर्सच्या हाती पडू शकतील. जागतिक शांती व स्थैर्य याला यापासून गंभीर धोका संभवत आहे’, असा इशारा भारताने दिला. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे राजनैतिक अधिकारी ए. अमरनाथ यांनी सुरक्षा परिषदेच्या कमिटीसमोर बोलताना हा धोका अधेोखित केला. यासाठी अमरनाथ यांनी कोरोनाच्या साथीचा दाखला दिला आहे.

सामूहिक संहार घडविणारी शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडतील - संयुक्त राष्ट्रसंघात भारताची चिंतासंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या 1540 कमिटीसमोर ‘प्रोलिफरेशन ऑफ न्यूक्लिअर, केमिकल अँड बायोलॉजिकल वेपन्स’ या विषयावरील मुक्त चर्चेत ए. अमरनाथ बोलत होते. अण्वस्त्रे तसेच सामुहिक संहार घडविणारी विध्वंसक शस्त्रास्त्रे दहशतवादी संघटनांच्या हाती पडली, तर त्यापासून जागतिक शांती व स्थैर्याला धोका निर्माण होईल. तितकाच धोका जैविक व रासायनिक शस्त्रे त्याच्या डिलिव्हरी सिस्टीमसह दहशतवाद्यांच्या हाती पडल्यानंतर संभवतो, असे भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी यावेळी बजावले.

कोरोनाची साथ आलेली असताना, जैविक व रासायनिक शस्त्रांचा एकाच वेळी वापर होण्याचा धोका बळावला होता, याची जाणीव ए. अमरनाथ यांनी यावेळी करून दिली. या धोक्याविरोधात मुक्त चर्चा ही अतिशय स्वागतार्ह बाब ठरते, असे सांगून ही कमिटी सदस्यदेशांना या धोक्याविरोधात मार्गदर्शन करू शकेल, असा विश्वास अमरनाथ यांनी व्यक्त केला आहे.
याबरोबरच या कमिटीचे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग व इतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतर संघटनांबरोबरील सहकार्य व्यापक करायला हवे. यामुळे सामुहिक संहाराची शस्त्रे चुकीच्या हातांमध्ये पडू नये यासाठी अधिक प्रभावीपणे प्रयत्न केले जाऊ शकतात, असा दावा अमरनाथ यांनी केला.

दहशतवादी संघटना अत्यल्प काळात सामुहिक संहाराची शस्त्रे विकसित करून त्याची मोक्याच्या जागी तैनाती करू शकतात, हे याआधीही उघड झाली होती. ही धक्कादायक बाब असून यामुळे दहशतवादी संघटनांना यापासून रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य देणे भाग आहे. सर्वच सदस्य देशांनी या धोक्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी केले आहे.

थेट उल्लेख केलेला नसला, तरी दहशतवादाचा उघडपणे पुरस्कार करणारा पाकिस्तानसारख्या देशाचा वापर करून सामूहिक संहार घडवून आणणारी शस्त्रे दहशतवादी संघटना मिळवू शकतात, अशी चिंता भारताला वाटत आहे. वेळोवेळी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर ही चिंता व्यक्त केली होती. यावेळीही थेट नामोल्लेख केला नसला, तरी भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला यासंदर्भात आवाहन करून पाकिस्तानवरील दडपण वाढविल्याचे दिसत आहे.

leave a reply