रशिया व इराणमध्ये ‘बार्टर ट्रेड’ सुरू होईल

- इराणच्या व्यापारमंत्र्यांची लक्षवेधी घोषणा

‘बार्टर ट्रेड'तेहरान – युक्रेनच्या युद्धानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी रशियावर कठोर आर्थिक व व्यापारी निर्बंध लादले आहेत. यामुळे इतर देशांना रशियाबरोबर व्यापार करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत, भारताने रशियाला बार्टरचा अर्थात वस्तूच्या मोबदल्यात वस्तूचा व्यावाप करण्याचा प्रस्ताव दिला होता. रशिया यावर विचार करीत आहे. इराणने देखील रशियासमोर ही बार्टर ट्रेडची योजना ठेवली आहे. रशियाकडून येणाऱ्या पोलादाच्या मोबदल्यात इराणने मोटारीचे सुटे भाग आणि गॅस टर्बाईन देण्याचा प्रस्ताव इराणने दिला आहे. इराणचे व्यापारमंत्री रेझा फतेमी अमिन यांनी ही माहिती दिली.

दोन दिवसांपूर्वी राजधानी तेहरानमध्ये इराण आणि रशियन नेत्यांची संयुक्त व्यापार आणि आर्थिक सहकार्य बैठक पार पडली. यानिमित्ताने इराणने रशियासमोर औद्योगिक पोलादाची (इंडस्‌‍ट्रियल स्टील) मागणी केली. तसेच रशियाकडून बार्टरद्वारे धातू आणि खाण क्षेत्रात वापरासाठी कच्च्या मालाची आयात करणार असल्याची घोषणा इराणने केली. यामध्ये झिंक, शिसे आणि ॲल्युमिनिअम या धातूंच्या आयातीचा समावेश असेल. इराणच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये या धातूची मागणी वाढत असून इराणसमोर यासाठी रशिया वगळता इतर पर्याय नसल्याचे व्यापारमंत्री अमिन यांनी सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

‘बार्टर ट्रेड'या मोबदल्यात इराण रशियाला सदर धातूच्या किंमतीएवढे मोटारीचे सुटे भागआणि गॅस टर्बाईन्स पुरवण्यास तयार आहे. इराण आणि रशियामध्ये बार्टर व्यापारावर यशस्वी चर्चा पार पडली. पण धातूच्या मोबदल्यात मोटारीचे सुटे भाग स्वीकारण्याच्या प्रस्तावावर रशिया तयार आहे का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. इराणच्या काही खाजगी कंपन्यांनी रशियन वीज प्रकल्पांमधील गॅस टर्बाईन्स दुरूस्त किंवा नवे बसविण्यासंबंधी करार केल्याचे व्यापारमंत्री अमिन पुढे म्हणाले. या व्यापारावर चर्चा करण्यासाठी रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवॅक उपस्थित होते.

या बैठकीच्या निमित्ताने इराणने रशियाबरोबर इंधनविषयक सहकार्यासंबंधी तीन करार केले. यामध्ये नैसर्गिक वायू, इंधन क्षेत्रातील संयुक्त प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच इराण रशियाला पेट्रोकेमिकल्स व तंत्रज्ञानविषयक सहाय्य पुरविणार असल्याची माहिती इराणचे इंधनमंत्री ओवजी यांनी दिली. याशिवाय इराण आणि रशियाच्या नेत्यांमध्ये स्थानिक चलनाचा वापर वाढविण्यावरही चर्चा पार पडली. येत्या काळात इराणचा रशियाबरोबरील व्यापार वाढेल, अशी अपेक्षा इराणचे नेते व्यक्त करीतआहेत. उपपंतप्रधान नोवॅक आणि व्यापारमंत्री अमिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर उभय देशांमधील आर्थिक सहकार्य 40 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा दावा इराणचे इंधनमंत्री जावेद ओवजी यांनी केला आहे.

दरम्यान, रशिया व इराणमध्ये अशारितीने व्यापार सुरू झाला तर दोन्ही देश अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांना अधिक चांगल्यारितीने तोंड देऊ शकतील. आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापारातून रशियाने अमेरिकन डॉलर वजा करण्यासाठी आक्रमक निर्णयघेतले आहेत. चीन तसेच इतर काही देशांबरोबर रशिया डॉलरला वगळून व्यापार करीत आहे. यामुळे रशियाचा प्रभाव वाढत चालला असून अमेरिकी डॉलरचे महत्त्व कमी झाल्याचे दावे केले जात आहेत.

निर्बंध लादून रशियाच्या विरोधात डॉलरचा हत्यारासारखा वापर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न रशियाने अमेरिकेवरच उलटविला आहे, अशी टीका आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ज्ञांनी केली होती.

leave a reply