रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी अर्थव्यवस्थेत दीड टक्क्यांची घसरण

वॉशिंग्टन – रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर वाढती महागाई, सरकारी खर्चात झालेली घट व व्यापारी तुटीत पडलेली भर यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था तब्बल दीड टक्क्यांनी घसरली आहे. 2021 सालच्या अखेरच्या तिमाहित अर्थव्यवस्थेत 6.9 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेतील घसरण अधिकच धक्कादायक ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील शेअरबाजारांनाही मोठा फटका बसल्याचे समोर आले होते. शेअरबाजारांना बसलेला फटका, वाढती महागाई व ‘जीडीपी’मध्ये झालेली घसरण यामुळे नजिकच्या काळात अमेरिकी अर्थव्यवस्था मंदीत जाण्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत.

अमेरिकेच्या ‘ब्युरो ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस’ने गुरुवारी अमेरिकी अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. त्यात 2022 सालच्या जानेवारी ते मार्च या तिमाहित विकासदरात 1.5 टक्क्यांची घसरण झाल्याचे सांगण्यात आले. या घसरणीमागे महागाई, सरकारी खर्चातील घट, खाजगी क्षेत्राकडून कमी झालेले गुंतवणुकीचे प्रमाण व वाढती व्यापारी तूट हे घटक कारणीभूत ठरल्याचे ‘ब्युरो ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस’ने स्पष्ट केले.

जानेवारी ते मार्च या काळात अमेरिकेची आयात निर्यातीपेक्षा जास्त राहिली. त्यामुळे अमेरिकेची व्यापारी तूट विक्रमी स्तरावर गेली. या तुटीमुळे आर्थिक विकासदराला तीन टक्क्यांहून अधिक फटका बसल्याचे अहवालात सांगण्यात आले. अमेरिकेची आयात वाढली असली तरी मोठ्या उद्योगांकडून मालाचा साठा करण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला असल्याचे ‘ब्युरो ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस’ने नमूद केले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवररशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील महागाई आधीच विक्रमी स्तरावर भडकली आहे. एप्रिल महिन्यातही महागाई निर्देशांक आठ टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आला. रशिया-युक्रेन युद्ध व चीनमधील कोरोनाचे उद्रेक यामुळे अमेरिकी उद्योगक्षेत्राला फटके बसत आहेत. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे परिणाम अमेरिकी कंपन्यांवर होत आहेत. कोरोनाची व्याप्ती कमी झाल्याने त्या अनुषंगाने सरकारकडून होणाऱ्या खर्चातही घट झाली आहे. हा घटकदेखील जीडीपीवर परिणाम करणारा ठरल्याचे सांगण्यात येते. ही अमेरिकी अर्थव्यवस्थेतील घसरण 2020 सालानंतरची पहिलीच घसरण ठरली आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख बेन बर्नांके यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेला असलेला मंदीचा धोका वाढल्याचा इशारा दिला होता. देशात महागाईचा जबरदस्त भडका उडाला असून बेकारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे व ही स्थिती पुढील एकदोन वर्षे कायम राहू शकते, असे सांगून बर्नांके यांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या घसरणीकडे लक्ष वेधले होते. बर्नांके यांच्यापूर्वी ‘गोल्डमन सॅक्स’चे प्रमुख लॉईड ब्लँकफेन, फॅनी माए व ‘बँक ऑफ अमेरिका’ या वित्तसंस्थांनीही मंदीबाबत इशारे दिले आहेत.

leave a reply