रशियावरील निर्बंध उठविले नाहीत तर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकासह अंतराळक्षेत्रातील इतर सहकार्य रोखून धरणार

- रशियन अंतराळसंस्थेच्या प्रमुखांचा इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – रशियन अर्थव्यवस्था संपवून देशाला गुडघे टेकणे भाग पडावे यासाठी पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. असे निर्बंध हटविल्याशिवाय रशिया पाश्‍चिमात्य देशांशी अंतराळक्षेत्रात सहकार्य करणार नाही, असा सज्जड इशारा रशियन अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी दिला.

रशियावरील निर्बंधरशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पाश्‍चिमात्य देशांनी रशियाविरोधात कडक निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशियाची अंतराळ क्षेत्रातील क्षमता संपविण्याचेही प्रयत्न केले जातील, असेही बजावले होते. त्यामुळे रशिया व पाश्‍चिमात्य देशांमधील अंतराळ सहकार्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. पाश्‍चिमात्य देशांच्या भूमिकेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून रशियानेही सहकार्य रोखण्याचा निर्णय घेतला होता.

अमेरिकेच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणार्‍या ‘आरडी-१८०’ या इंजिन्सचा पुरवठा रशियाने गेल्या महिन्यात बंद केला आहे. त्यापाठोपाठ जर्मनीबरोबरील संयुक्त अंतराळ प्रकल्पातून रशियाने माघार घेतली असून ब्रिटनच्या ‘वनवेब’ कंपनीचे उपग्रह यापुढे प्रक्षेपित केले जाणार नाहीत, असेही रशियाने जाहीर केले होते. रशियाने युरोपियन स्पेस एजन्सीबरोबरील करारही रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता रोगोझिन यांनी आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातील सहकार्यही रोखण्याचा इशारा दिला आहे.

रशियावरील निर्बंध‘पाश्‍चिामात्य देशांनी विनाअट रशियावरील बेकायदेशीर निर्बंध उठविले तरच आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक व इतर संयुक्त अंतराळ प्रकल्पात रशिया सहकार्य करील’, असे रशियन अंतराळसंस्थेचे प्रमुख दिमित्रि रोगोझिन यांनी बजावले. सध्या अमेरिका, कॅनडा, जपान व युरोपिय महासंघाबरोबर चालू असलेल्या अंतराळ प्रकल्पांची माहिती रशियन नेतृत्त्वाला देऊन पुढील पावले उचलण्यात येतील, असेही रोगोझिन म्हणाले.

सध्या अंतराळक्षेत्रात सक्रिय असणार्‍या आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकाचा कालावधी २०३० सालापर्यंत असल्याचे सांगण्यात येते. मात्र रशियाने २०२४ सालापर्यंतच सहकार्याची हमी दिली असून त्यानंतर रशिया स्वतंत्र अवकाशस्थानकाच्या उभारणीवर लक्ष देईल, असा दावा करण्यात आला आहे.

leave a reply