रशिया-ताजिकिस्तान अफगाण सीमेवरील सुरक्षा वाढविणार

putin-tajikistanमॉस्को/काबुल – ‘आयएस’ संलग्न दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानात जम बसविला आहे. तालिबानच्या राजवटीसाठी आव्हान ठरू लागलेली ही संघटना येत्या काळात मध्य आशियाई देशांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकते, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. अशावेळी रशियाने ताजिकिस्तानसह अफगाणिस्तानच्या सीमेवरील सुरक्षा वाढविण्याची घोषणा केली. तसेच तालिबानच्या राजवटीबरोबर संबंध सुरळीत करण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी जाहीर केले.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मंगळवारी ताजिकिस्तान या माजी सोव्हिएत देशाला भेट दिली. युक्रेनचे युद्ध भडकल्यापासून रशियन राष्ट्राध्यक्षांचा हा पहिला विदेश दौरा ठरतो. आपल्या या भेटीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ताजिकिस्तानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविणार असल्याचे स्पष्ट केले. ताजिकिस्तानच्या लष्कराच्या आधुनिकीकरणाची गरज असल्याचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ताजिक राष्ट्राध्यक्ष इमोमअली राहमोन यांच्याबरोबरच्या भेटीत स्पष्ट केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या सीमेवर रशिया-ताजिकिस्तानची सुरक्षा वाढविणार असल्याची घोषणा रशियन राष्ट्राध्यक्षांनी केली.

Islamic-Stateअफगाणिस्तानबाबत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी तालिबानच्या राजवटीबरोबर संबंध सुरळीत करणार असल्याचे म्हटले आहे. ‘अफगाणिस्तानातील राजकीय नेतृत्वाबरोबर चर्चा करून या देशातील परिस्थिती सामान्य करण्यासाठी रशियाचे प्रयत्न सुरू आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढे म्हणाले. पण यासाठी तालिबानने देखील पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे रशियन राष्ट्राध्यक्षांनी बजावले आहे. अफगाणिस्तानातील सर्व गटांना तालिबानने सरकारमध्ये प्रतिनिधित्त्व द्यावे, अशी मागणी यावेळी रशियन राष्ट्राध्यक्षांनी उचलून धरली.

यानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्घाबात येथे कॅस्पियन बैठकीत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये रशिया व तुर्कमेनिस्तानसह इराण, कझाकस्तान आणि अझरबैजान या देशांचे नेते सामील होतील. अफगाणिस्तानातील आयएससंलग्न दहशतवादी संघटनेचा वाढता प्रभाव शेजारी मध्य आशियाई देशांसाठी धोकादायक असल्याचा मुद्दा या बैठकीत मांडला जाऊ शकतो.

leave a reply