रशियातील पाश्चिमात्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊ

-रशियन प्रवक्त्यांची धमकी

assets-Russiaमॉस्को – रशियातील पाश्चिमात्यांच्या मालमत्ता व उद्योग ताब्यात घेऊ, असा इशारा रशियाच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी दिला. रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर पाश्चिमात्यांनी रशियाच्या परदेशातील अनेक मालमत्ता तसेच खाती गोठविणारे निर्बंध लादले होते. यात रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या 300 अब्ज डॉलर्सच्या परकीय गंगाजळीचाही समावेश आहे. या गंगाजळीचा वापर युक्रेनच्या पुनर्ऊभारणीसाठी करण्याचे संकेत पाश्चिमात्य देशांमधील अधिकारी देत असून त्यावर रशियाने इशारा दिल्याचे दिसत आहे.

assets-in-Russiaरशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर प्रचंड निर्बंध लादले आहेत. गेल्या चार महिन्यात रशियातील हजारहून अधिक उद्योजक, नेते तसेच कंपन्यांना निर्बंधांचे लक्ष्य करण्यात आले आहे. रशियाची परदेशातील अनेक खाती गोठविण्यात आली असून त्यात रशियन उद्योजक व नागरिकांच्या खाजगी मालमत्तांचाही समावेश आहे. त्याचवेळी रशियाच्या मध्यवर्ती बँकेचा 300 अब्ज डॉलर्सचा निधीही रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येते. अनेक परदेशी कंपन्यांनी रशियातील आपले उपक्रम बंद केले आहेत.

पाश्चिमात्यांच्या या निर्बंधांविरोधात रशियानेही आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यात परदेशी कंपन्यांचे उपक्रम ताब्यात घेण्यासह त्यांच्याकडील निधी तसेच इतर मालमत्ता ताब्यात घेण्याच्या कारवाईचाही समावेश आहे. झाखारोव्हा यांनी दिलेला इशारा त्याचाच भाग ठरतो. यावेळी रशियन प्रवक्त्यांनी पाश्चिमात्यांनी टाकलेले निर्बंध व मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन असल्याचा आरोपही केला. जर पाश्चिमात्यांनी लोकशाही, खुली अर्थव्यवस्था यासारख्या तत्वांचे पालन केले नाही तर रशियाही त्याच धर्तीवर कारवाई करेल, असेही त्यांनी बजावले.

leave a reply