रशियाकडून अंतराळक्षेत्र व आण्विक हल्ल्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी

आण्विक हल्ल्याची क्षमतामॉस्को – रशियाने गेल्या काही दिवसात ‘अँटी सॅटेलाईट वेपन’सह प्रगत हायपरसोनिक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यात दीर्घ पल्ल्याच्या ‘14टीएस033 नुडॉल’ या ‘इंटरसेप्टर मिसाईल’सह ‘झिरकॉन’चा समावेश आहे. ध्वनीच्या 12 पट वेग असणाऱ्या ‘14टीएस033 नुडॉल’ क्षेपणास्त्रात पृथ्वीच्या भ्रमणकक्षेतील उपग्रह उडवून देण्याची क्षमता असल्याचा दावा रशियाने केला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनेही आपल्या युद्धनौकेवरून ‘अँटी सॅटेलाईट वेपन’ अशी ओळख असणाऱ्या ‘एसएम-3’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.

आण्विक हल्ल्याची क्षमतारशियाच्या संरक्षण विभागाने दोन्ही क्षेपणास्त्र चाचण्यांचे व्हिडिओ तसेच फोटोग्राफ्स प्रसिद्ध केले आहेत. पहिली चाचणी ‘14टीएस033 नुडॉल’ या क्षेपणास्त्राची असून ती कझाकस्तानमधील ‘सारी-शगन टेस्ट रेंज’वर घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. रशियाच्या संरक्षण विभागाने हे क्षेपणास्त्र अंतराळ तसेच हवाईक्षेत्रातून होणाऱ्या हल्ल्यांना रोखू शकते, असा दावा केला आहे. त्याचवेळी ‘14टीएस033 नुडॉल’ रशियाच्या ‘एरोस्पेस फोर्सेस’मध्ये आधीच तैनात करण्यात आल्याचेही सांगितले आहे. हे क्षेपणास्त्र अवकाशात 40 हजार ते आठ लाख मीटर उंचीवर असणाऱ्या लक्ष्यांना भेदू शकते, असेही सांगण्यात येते.

‘झिरकॉन’ या हायरपसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी आर्क्टिक क्षेत्रातील युद्धनौकेवरून घेण्यात आली आहे. ध्वनीच्या आठ पट वेग असणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी खास पुढाकार घेतला होता. आण्विक हल्ल्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र अमेरिकी शहरांवर हल्ला चढवू शकते, असा दावा राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केला होता. ‘ॲडमिरल गोर्शकोव्ह’ या विनाशिकेवरून ‘व्हाईट सी’मध्ये चाचणी घेण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. गेल्या दोन महिन्यात घेण्यात आलेली ‘झिरकॉन’ची ही दुसरी चाचणी ठरली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती.

leave a reply