सौदी व मित्रदेशांचे येमेनमधील हौथी बंडखोरांवर हवाई हल्ले

हौथीएडन – सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी शुक्रवारी येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले चढविले. त्याचबरोबर ‘रेड सी’च्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या इंधनवाहू जहाजांवर हल्ले चढविण्यासाठी हौथी बंडखोरांनी पेरलेले सागरी सुरूंग निकामी केल्याची माहिती सौदीच्या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली. चार दिवसांपूर्वी सौदीच्या ‘अराम्को’ कंपनीच्या ‘ऑईल टँक’ तसेच ‘रेड सी’मधील एका इंधनवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर सौदीने ही कारवाई केली आहे.

गेल्या दोन दिवसात इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधनक्षेत्रावरील हल्ले तीव्र केल्याचे दिसत आहे. याद्वारे हौथी बंडखोर केवळ सौदीच नाही, तर जागतिक इंधन सुरक्षेला लक्ष्य करीत असल्याचा आरोप सौदीने केला आहे. सोमवारी सौदीच्या जेद्दाह शहरातील ‘अराम्को’ कंपनीच्या ‘ऑईल टँक’वर क्षेपणास्त्र हल्ला झाला होता. हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून ‘कुद्स-2’ या इराणी क्षेपणास्त्राचा वापर केल्याचे जाहीर केले. सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांना अद्दल घडविण्यासाठी हा हल्ला चढविल्याचे हौथी बंडखोरांनी म्हटले होते.

हौथी“आपल्या ‘कुद्स-2’ क्षेपणास्त्रांच्या निशाण्यावर जेद्दाह नसून इस्रायलच्या दक्षिणेकडील ‘इलॅट’ शहर होते. पण येमेनवरील सौदीच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणि येमेनमधील सौदीच्या लष्कराचा गराडा उठविण्यासाठी जेद्दाहवर हल्ला चढवावा लागला. यापुढेही सौदीने येमेनवरील हल्ले रोखले नाही तर याहून भीषण हल्ले चढविले जातील”, अशी धमकी हौथी बंडखोरांच्या वरिष्ठ नेत्याने दिली. रविवारी सौदीच्या बंदरात उभ्या असलेल्या ग्रीक इधनवाहू टँकरवर घातपाती हल्ला झाला. सागरी सुरूंगाच्या स्फोटामुळे या टँकरला भीषण आग लागली. हल्ल्यात सदर टँकरमधील कर्मचाऱ्यांचे किंवा इंधनाचे नुकसान झाले नाही. पण या स्फोटामुळे ‘रेड सी’मधील इंधनवाहू जहाजांना असलेला धोका वाढल्याची चिंता सौदी व अरब मित्रदेशांनी व्यक्त केली. चार दिवसांपूर्वी सौदीच्या अराम्को कंपनीच्या ‘ऑईल टँक’वरील हल्ल्यानंतरही सौदीकडून अशीच चिंता व्यक्त करण्यात आली होती.

हौथीया हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सौदी अरेबिया व अरब मित्रदेशांनी हौथी बंडखोरांना अद्दल घडविण्यासाठी मोठी लष्करी कारवाई हाती घेतली. यात हौथी बंडखोरांना मोठी हानी सोसावी लागल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या हल्ल्यानंतर सौदीच्या लष्कराने ‘रेड सी’मध्ये विशेष मोहीम राबवून आपल्या इंधनवाहतूक करणाऱ्या जहाजांसाठी धोकादायक बनलेले सागरी सुरुंग निकामी केले आहेत. इराणसंलग्न हौथी बंडखोरांनी हे सागरी सुरूंग पेरल्याचा आरोप सौदीच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला.

दरम्यान, येमेनमधील हौथी बंडखोर इराणच्या इशाऱ्यावर सौदीच्या विरोधात कारवाई करीत असल्याचा आरोप सौदीने अनेकवार केला होता. हौथी बंडखोरांना इराणकडूनच शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जातो, असे सांगून सौदीने यासंदर्भातील पुरावेही आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले होते. मात्र इराणने आपल्यावरील हे आरोप नाकारले आहेत.

हौथी बंडखोर व सौदी अरेबियामधील हा संघर्ष म्हणजे सौदीचा इराणबरोबरील अप्रत्यक्ष संघर्ष असल्याचे दावे विश्‍लेषक करीत आहेत. पुढच्या काळात हा संघर्ष कमी न होता अधिकाधिक तीव्र होत जाईल, असा इशारा विश्‍लेषकांकडून दिला जात आहे.

leave a reply