पोलंडमधील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या मुद्यावरून सुरक्षा परिषदेत रशिया व पाश्चिमात्य देशांमध्ये खडाजंगी

- अमेरिका व युक्रेनमध्येही मतभेद

पाश्चिमात्यन्यूयॉर्क/मॉस्को – युक्रेनने मंगळवारी पोलंडमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचे तीव्र पडसाद बुधवारच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत उमटले. पोलंडवरचा क्षेपणास्त्र हल्ला युक्रेनमधून झालेला असला तरी त्यासाठी रशियाच जबाबदार असल्याचा ठपका अमेरिका, ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांनी ठेवला. तर पाश्चिमात्य देशांनी युक्रेनच्या आक्रमकतेचे समर्थन केले नसते, तर रशियाला त्याविरोधात लष्करी मोहीम छेडावीच लागली नसती, असे सणसणीत प्रत्युत्तर रशियाने दिले. दुसऱ्या बाजूला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये झालेल्या हल्ला युक्रेनने केलाच नसल्याची एकतर्फी भूमिका कायम ठेवली आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा हल्ला रशियाने केल्याचा पुरावा नसल्याचे सांगून युक्रेनचे म्हणणे खोडून काढले.

पाश्चिमात्यमंगळवारी युक्रेनचा शेजारी देश व नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडमध्ये रशियन बनावटीचे क्षेपणास्त्र कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. युक्रेन-पोलंड सीमेवर असलेल्या प्रेझ्यूवोडोव गावात क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात दोघांचा बळी गेला होता. हल्ला झालेले क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे असल्याचे आढळल्यानंतर हा हल्ला रशियाकडून झाला असावा, अशी ओरड सुरू झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून या हल्ल्यावर टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. युक्रेन, पोलंडसह काही युरोपिय देशांनी रशियाविरोधात जोरदार आगपाखड सुरू केली. ‘जी२०’ गटाची बैठक सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने रशिया-युक्रेन संघर्षाचे रुपांतर रशिया-नाटो युद्धात होण्याची भीती वर्तविण्यात आली होती. बालीमध्ये सुरू असलेली जी२०ची बैठक थांबवून त्यातील नाटो सदस्य देशांची आपत्कालिन बैठकही घेण्यात आली.

पण काही तासांमध्येच सदर हल्ला युक्रेनच्या हवाईसुरक्षा यंत्रणेकडून झाल्याचे उघड झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे काही देशांकडून रशियाची कोंडी करण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना खीळ बसली. मात्र बुधवारी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अमेरिकेसहित मित्रदेशांनी पुन्हा रशियालाच धारेवर धरले. रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचे हल्ले केले नसते, तर ही घटना घडलीच नसती; त्यामुळे यासाठी रशियाच जबाबदार असल्याचा अमेरिका व पोलंडच्या राजदूतांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या वरिष्ठ अधिकारी रोझमेरी डिकार्लो यांनीही, रशिया-युक्रेन युद्धाचा अंत सध्या तरी दृष्टिपथात नसून या संघर्षाचे परिणाम पोलंडसारख्या घटनेतून घडताना दिसतील, असा दावा केला. ब्रिटनच्या राजदूतांनीही अमेरिका व पोलंडचे आरोप उचलून धरले.

पाश्चिमात्यअमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या या आरोपांना रशियाचे राजदूत व्हॅसिली नेबेन्झिआ यांनी घणाघाती प्रत्युत्तर दिले. ‘युक्रेनमध्ये २०१४ साली घडलेल्या घटनांनंतर मिन्स्क करार झाला होता. या कराराची अंमलबजावणी झाली असती तर रशियाला युक्रेनमध्ये लष्करी मोहीम हाती घ्यावीच लागली नसती. पाश्चिमात्य देशांनी युक्रेनमध्ये हस्तक्षेप करून त्याला शस्त्रपुरवठा केला नसता तर रशिया-युक्रेन संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता नव्हती. युक्रेनने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून पाश्चिमात्य देशांनी त्या राजवटीला समज दिली असती, तर रशियाला क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवावे लागले नसते’, असे रशियन राजदूतांनी ठासून सांगितले. पोलंडमध्ये झालेला हल्ला रशिया व नाटोमध्ये संघर्षाचा भडका उडावा यासाठी चिथावणी असल्याचा आरोप राजदूत नेबेन्झिआ यांनी केला.

दरम्यान, पोलंडमध्ये झालेला हल्ला युक्रेनच्या यंत्रणेने केलेलाच नसल्याची भूमिका राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी घेतली आहे. अमेरिका व पोलंडसह सर्व देशांनी हल्ला युक्रेनमधील हवाईसुरक्षा यंत्रणेतून झाल्याला दुजोरा दिला असतानाही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आपला आडमुठेपणा कायम ठेवल्याचे दिसत आहे. त्यांच्या या भूमिकेवर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली असून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी, झेलेन्स्की यांच्या वक्तव्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.

leave a reply