शत्रूचा वेध घेऊन दणका देण्याची क्षमता रशियन नौदलाकडे आहे

- राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा इशारा

रशियन नौदलमॉस्को – ‘रशिया व रशियन हितसंबंधांचे रक्षण करण्यास रशियन नौदल पूर्णपणे सज्ज आहे. शत्रू पाण्याखाली, जमिनीवर अथवा हवेत कुठेही असला तरी नौदल त्याचा माग काढू शकते. आवश्यकता पडल्यास शत्रूला टाळता येणार नाही असा जबरदस्त दणका देण्यासही रशियन नौदल सक्षम आहे’, असा खरमरीत इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. गेल्या महिन्यात ब्र्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास केला होता. या मुद्यावरून रशिया व ब्रिटनमधील तणाव चांगलाच चिघळला होता. या पार्श्‍वभूमीवर पुतिन यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

रविवारी रशियन नौदलाच्या स्थापनेला 325 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सेंट पिट्सबर्गसह अनेक भागांमध्ये संचलनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्ष पुतिन यावेळी पार पडलेल्या नौदल संचलनाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी रशियन नौदलाच्या क्षमतेची व सज्जतेची प्रशंसा करून शत्रूदेशांना इशारा दिला. जगाच्या सागरी क्षेत्रातील बहुतांश प्रमुख भागांमध्ये रशियन नौदलाने आपले अस्तित्त्व दाखवून दिल्याचा दावा रशियन राष्ट्राध्यक्षांनी यावेळी केला. हायपरसोनिक क्षेपणास्त्रे, आण्विक पाणबुड्या, ‘कोस्टल डिफेन्स सिस्टिम्स’ यांच्या जोरावर रशियाने जगातील आघाडीच्या आरमारांमध्ये जागा मिळविल्याची ग्वाही पुतिन यांनी दिली.

गेल्या महिन्यात, ब्रिटनची युद्धनौका ‘एचएमएस डिफेन्डर’ने क्रिमिआनजिकच्या सागरी हद्दीतून प्रवास केला होता. त्यावेळी रशियन गस्तीनौकांनी ब्रिटीश युद्धनौकेचा पाठलाग करून ‘वॉर्निंग शॉट्स’ झाडले होते. रशियाच्या लढाऊ विमानांनी ब्रिटीश युद्धनौकेला रोखण्यासाठी समुद्रात बॉम्ब्स टाकले असा दावाही रशियन संरक्षणदलाने केला होता. मात्र ब्रिटनने यासंदर्भातील रशियाचे सर्व दावे फेटाळून लावले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या संपूर्ण प्रकरणामागे अमेरिकेची चिथावणी होती, असा आरोप केला होता.

ब्रिटीश युद्धनौकेच्या मोहिमेनंतर रशियाने ‘ब्लॅक सी’मधील नाटो व इतर देशांचे सराव तसेच नाविक हालचाली गांभीर्याने घेतल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच रशियाने क्रिमिआमध्ये ‘एस-400’सह इतर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करून ‘एरिअल डिनायल टेस्टस्’ प्रकारातील चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर ‘बॉम्बर्स’ व लढाऊ विमानांच्या सहाय्याने ‘बॉम्बिंग एक्सरसाईज’ही केला होता.

दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र विभागाने काही बाह्य शक्ती ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रातील वातावरण कृत्रिमरित्या बिघडवित असल्याचा आरोप केला आहे. ‘ब्लॅक सी’ क्षेत्राशी निगडीत ‘माँट्रेक्स कन्व्हेंशन’ची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही रशियाकडून यावेळी करण्यात आली. या मुद्यावर तुर्कीची भूमिका महत्त्वाची असल्याकडेही रशियाने यावेळी लक्ष वेधले.

leave a reply