अंतराळयानात वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची हानी स्वयंदुरुस्त करणारे मटेरियल भारतीय संशोधकांकडून विकसित

इलेक्ट्रॉनिकनवी दिल्ली – अंतराळयानासारख्या किचकट तंत्रज्ञानात वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची स्वयंदुरुस्ती करू शकेल, अशा मटेरियलचा शोध भारतीय संशोधकांनी लावला आहे. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. संशोधकांनी ‘पायझोइलेक्ट्रीक मोलेक्यूल’ तयार केला असून त्याला ‘बायपाराझोल ऑर्गेनिक क्रिस्टल’ असे नाव देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सततच्या वापरामुळे जाणारे तडे, भेगा व इतर हानी हा पदार्थ काही मिली सेकंदातच भरून काढेल. त्यामुळे हा शोध येत्या काळात क्रांतिकारी ठरेल, असा दावा केला जातो.

‘भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थे’ने (आयआयएसईआर) ‘आयआयटी खरगपूर’च्या संशोधकांच्या साथीने हा पदार्थ विकसित केला आहे. हे पायझोइलेक्ट्रिक रेणवीय स्फटीक असून यांत्रिक बिघाड झाल्यानंतर विद्युत प्रभार निर्माण करून हा पदार्थ स्वत:च ही हानी भरून काढतो. कोणत्याही घन रेणवीय पदार्थांमध्ये बिघाड झाल्यास विद्युत प्रभार अर्थात इलेक्ट्रीक चार्ज उत्पन्न करण्याच्या या पदार्थाच्या अजब व आगळ्यावेगळ्या क्षमतेमुळे हे शक्य होणार आहे. हानी अथवा बिघाड झालेल्या भागातील तुटलेले तुकडे विद्युत प्रभार उत्पन्न झाल्यामुळे पुन्हा खेचले जातात व बिघाड झालेल्या भागाची दुरुस्ती होते.

‘बायपाराझोल ऑर्गेनिक क्रिस्टल’चा विविध इलेक्ट्रीक उपकरणांमध्ये याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अंतराळयानासारख्या किचकट तंत्रज्ञानात वापरल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक उपकरणासाठी याचा वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अंतराळयानातील अशा उपकरणात बिघाड झाल्यास तेथे मानवी हस्तक्षेप करणे कठीण असते. तेथे अशा स्वयंदुरुस्ती करणार्‍या तंत्रज्ञानामुळे वेळ, परिश्रम, खर्च सर्वच गोष्टी वाचू शकतील.

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्डा’ने (एसईआरबी) या संशोधनासाठी सर्व प्रकारचे आर्थिक सहाय्य संशोधकांना पुरविले होते. तसेच ‘भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान संस्थे’च्या प्रोफेसर सी.एम.रेड्डी यांना यासाठी फेलोशिपही देण्यात आली होती. ‘आयआयएसईआर’च्या कोलकाता येथील संशोधक पथकाने प्रोफेसर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधन केले.

‘आयआयएसईआर’च्या निर्माल्य घोष यांचेही या संशोधनात मोठे योगदान आहे. पायझोइलेक्ट्रिक ऑर्गेनिक स्फटिकांच्या अचूक मोजमापासाठी त्यांनी अत्याधुनिक पोलारायझेशन मायक्रोस्कोपिक पद्धत वापरली आहे. तेच आयआयटी खरगपूर येथील प्रोफेसर भानू भूषण खटाव आणि डॉक्टर सुमंत करण यांनी शेतीसाठी वापरर्‍या जाणार्‍या उपकरणांमध्ये या नवीन पदार्थाची कामगिरी तपासली आहे, असे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. हे संशोधन सायन्स जर्नलमध्येही नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply