छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यातील; २२ शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही

- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली/रायपूर – छत्तीसगडच्या बिजापूरमधील जंगलात माओवाद्यांबरोबरील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या २२ वर पोहोचली. हा हल्ला घडविणार्‍या माओवाद्यांच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, योग्य वेळी याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी उच्चस्तरिय सुरक्षाविषयक बैठक घेऊन माओवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवायांची माहिती घेतली. पुढच्या काळात माओवाद्यांच्या विरोधातील कठोर कारवाई संकेत या बैठकीतून मिळत असल्याचे दावे केले जातात.

शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास छत्तीसगडच्या बिजापूर येथील जंगलात गस्त घालणार्‍या सीआरपीएफ व सीआरपीएफच्या कोब्रा पथकाच्या जवानांवर माओवाद्यांनी भ्याड हल्ला चढविला. सुमारे ४०० च्या संख्येने असलेल्या माओवाद्यांनी चढविलेल्या या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्याची बातमी शनिवारी आली होती. चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या १७ जवानांचे मृतदेह सापडल्यानंतर या शहीद जवानांची संख्या २२ वर पोहोचल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. तसेच या चकमकीत ३० जवान जखमी झाले आहेत. तर यावेळी ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या २५ ते ३० इतकी असावी, असा दावा सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी केला आहे.

माओवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून माओवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. बिजापूरमधील चकमकीनंतर माओवाद्यांच्या विरोधात मोहीम छेडण्यात आली असून यात दोन हजार जवान सहभागी झाले आहेत. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामधील तारेम, उसूर, पामेडमधून तसेच सुकूमा जिल्ह्यामधील मिनपा, नरसपूरम अशा पाच ठिकाणांहून ही मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच यानंतर माओवाद्यांवर अधिक कठोर कारवाईसाठी छत्तीसगडच्या दुर्गम भागात ‘सीआरपीएफ’चे कॅम्प उभारण्याची मोहीम अधिकच तीव्र केली जाईल, असे महासंचालक कुलदीप सिंग यांनी म्हटले आहे.

सीआरपीएफने आधीपासूनच या ठिकाणी कॅम्प उभारण्याची तयारी केली होती. यामुळे व सीआरपीएफच्या कारवायांमुळे वैफल्यग्रस्त बनलेल्या माओवाद्यांनी हा हल्ला केल्याचे कुलदीप सिंग पुढे म्हणाले. या हल्ल्यासाठी माओवाद्यांनी रॉकेट लॉंचर्सचा वापर केल्याच्या चिंताजनक बातम्या येत आहेत. तसेच सदर हल्ल्यानंतर जवानांच्या रायफलीही माओवाद्यांनी पळविल्याचे उघड झाले आहे. पण या हल्ल्यातील शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जणार नाही, योग्य वेळी त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी बजावले आहे. त्यामुळे पुढच्या काळात माओवाद्यांची पाळेमुळे खणून काढणारी कारवाई अधिकच कठोरपणे केली जाईल, असे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी बिजापूरमधील या हल्ल्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली. तसेच रविवारी गृहमंत्र्यांनी उच्चस्तरिय सुरक्षा विषयक बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभाग, सीआरपीएफ व गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

leave a reply