कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध

- शनिवार व रविवारी लॉकडाऊन

मुंबई – रविवारी कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रात २२२ जणांचा बळी गेला. तर रविवारी राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५७ हजारांच्या पुढे गेली आहे. या साथीचा फैलाव चिंताजनकरित्या वाढत असताना, राज्य सरकारने कडक निर्बंधांच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. यानुसार सकाळच्या वेळी जमावबंदी व रात्री आठनंतर संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. तसेच खाजगी कंपन्यांच्या आस्थापनांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची व्यवस्था पुन्हा सुरू करावी, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच सरकारी कार्यालये देखील ५० टक्के इतक्या क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार असून शनिवार व रविवारी लॉकडॉऊन लागू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक रविवारी पार पडली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, अशी चर्चा सुरू होती. कोरोनाची साथ नियंत्रणात न येता, याचा फैलाव झपाट्याने होत आहे. याचा जबरदस्त ताण राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर येत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन करून कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यावाचून पर्याय नसल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. मात्र हा पर्याय अनेकजणांच्या रोजीरोटीवर परिणाम करणारा ठरेल, असे इशारे काहीजणांकडून दिले जात आहे. त्यापेक्षा कठोर निर्बंधांचा वापर करून कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला राज्य सरकारला दिला जात आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

या पार्श्‍वभूमीवर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळात कोरोनाच्या साथीवर झालेली चर्चा व निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. सकाळच्या वेळी जमावबंदी व रात्री आठनंतर संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच मॉल्स, बार व रेस्टॉरंट बंद करण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. मात्र रेस्टॉरंटस्ना ‘टेक अवे’ अर्थात पार्सल पुरविण्याची सेवा सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. थिएटर्स, सलून व जीम देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. राजकीय कार्यक्रम व सभा यांच्यावर तात्पुरती बंदी लागू करण्यात येईल. पण आवश्यक ती दक्षता घेऊन उद्योग सुरू ठेवले जातील, असे आरोग्यमंत्री म्हणाले. तसेच राज्यातील बांधकामे देखील सुरू राहणार आहेत.

भाजीपाला व इतर बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार नाही. मात्र इथे गर्दी होणार नाही याकडे लक्ष पुरविले जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. चित्रपट व टीव्ही मालिकांचे चित्रिकरण शक्य तितक्या कमी मनुष्यबळाने करण्याची सूचना करण्यात आली आहे. रेल्वे, बस, टॅक्सी व रिक्षा वाहतूक काही निर्बंधांसह सुरू ठेवण्यात येणार आहे. आसनाच्या क्षमतेइतक्याच प्रवाशांना रेल्वे व बसमधून प्रवास करता येईल. तसेच टॅक्सी व रिक्षातून दोन प्रवाशांनाच जाता येईल.

कोरोनाच्या साथीसंदर्भात करण्यात आलेल्या या व इतर नियमांचे उल्लंघन केल्यास सुमारे ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. ज्या हाऊसिंग सोसायट्यांमध्ये पाचहून अधिक रुग्ण आढळतील, त्या सोसायट्या कंटेन्मेंट झोन जाहीर केल्या जातील. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आलेली असली तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच शनिवारी व रविवारी लागू करण्यात येणार्‍या लॉकडाऊनमध्ये मात्र अत्यावश्यक सेवा वगळता सारे काही बंद असेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

leave a reply