26/11च्या सूत्रधारांपैकी एक असलेल्या ‘साजिद मीर’च्या शीरावर अमेरिकेकडून 50 लाख डॉलर्सचे ईनाम

वॉशिंग्टन – मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यासह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या साजिद मीर याच्या शीरावर अमेरिकेने 50 लाख डॉलर्सचे ईनाम जाहीर केले आहे. ‘लश्‍कर-ए-तोयबा’चा दहशतवादी असलेल्या साजिद मीर याला पकडून देणारी किंवा त्याला सजा देण्यासाठी आवश्‍यक असलेली माहिती पुरविणाऱ्याला हे इनाम दिले जाईल. अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश असलेला साजिद मीर पाकिस्तानात मुक्तपणे वावरत असल्याचे वारंवार उघड झाले होते. त्यामुळे 26/11च्या बाराव्या स्मरणदिनाचे औचित्य साधून अमेरिकेने केलेली घोषणा पाकिस्तानचा थरकाप उडविणारी ठरत आहे.

26/11च्या हल्ल्याच्या कटाची आखणी व त्याची अंमलबजावणी यात साजिद मीरने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. घातपात घडविणाऱ्या दहशतवाद्यांना मीर याच्याकडून सूचना मिळत असल्याचे दावे केले जातात. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, डेन्मार्क व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही सजिद मीरचा हात असल्याचे उघड झाले होते. इतकेच नाही तर 26/11च्या हल्ल्यासाठी सहाय्य पुरविणाऱ्या डेव्हिड हेडलीला आपल्या दहशतवादी संघटनेत भरती करण्याचे कामही मीर यानेच केले होते.

साजिद मीर पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयचा किंवा पाकिस्तानी लष्कराचा अधिकारी असल्याचे दावे करण्यात येतात. अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड यादीत असूनही साजिद मीर पाकिस्तानात मुक्तपणे संचार करीत असल्याचे समोर आले होते. अमेरिकेकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या दहशतवादविषयक अहवालांमध्ये साजिद मीर पाकिस्तानातील मुरीदके येथील ‘लश्‍कर’च्या तळावर असल्याचे नमूद करण्यात आले होते. भारत व अमेरिकेनेही साजिद मीर याच्याबाबत पाकिस्तानला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. मात्र पाकिस्तानने याबाबत कायम नकारघंटा वाजविली होती.

साजिद मीर हा अतिशय प्रभावशाली दहशतवादी आहे. त्यामुळेच पाकिस्तान अमेरिकेचेही दडपण झुगारून या आघाडीवर सहकार्य करण्यास तयार नसल्याचा दावा माध्यमांकडून केला जातो. मात्र आता 26/11 च्या हल्ल्याला बारा वर्षे उलटल्यानंतर, या हल्ल्यात आपले सहा नागरिक गमावणाऱ्या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने साजिद मीरच्या शीरावर 50 लाख डॉलर्सचे ईनाम जाहीर केले आहे. त्याला पकडून देणारी किंवा त्याला सजा देण्यासाठी पुरेशी ठरणारी माहिती पुरविणाऱ्याला हे ईनाम दिले जाईल. याचा फार मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे.

सध्या फायनॅन्शिअल ॲक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) ग्रे लिस्टमध्ये असलेला पाकिस्तान या यादीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तान दहशतवादी देश नसून दहशतवादाची शिकार ठरलेला देश असल्याचा आरडाओरडा इम्रान खान यांचे सरकार करीत आहे. अशा परिस्थितीत ‘साजिद मीर’सारखा खतरनाक दहशतवादी तुमच्या देशात मुक्तपणे वावरत आहे, याची आठवण अमेरिकेने पाकिस्तानला करून दिली आहे. यामुळे पुढच्या काळात पाकिस्तानचा ‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीतील प्रवेश निश्‍चित होऊ शकतो. तसे झाले तर आधीच संकटात असलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला जाईल, अशी चिंता पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली होती.

असे असूनही पाकिस्तान दहशतवादी संघटना व त्यांच्या म्होरक्यांचा बचाव करण्याचे उद्योग सोडून द्यायला तयार नाही. मात्र भारताच्या आक्रमक राजनैतिक मोहीमेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाकडे केंद्रीत झाले असून अमेरिकेने साजिद मीरवर जाहीर केलेले 50 लाख डॉलर्सचे ईनाम भारताच्या या मोहिमेला मिळालेले फार मोठे यश ठरते.

leave a reply