इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळावर सात रॉकेट हल्ले

रॉकेट हल्ले

बगदाद – इराकमधील तिग्रीस नदीजवळील अमेरिकेच्या हवाईतळावर सोमवारी सात रॉकेट हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच या हल्ल्यांसाठी कुणावरही आरोप करण्याचे अमेरिकी लष्कराने टाळले आहे. गेल्या महिन्याभरात इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तसेच हवाई तळांवरील व दूतावासावरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना या हल्ल्यांसाठी जबाबदार असल्याचा दावा केला जातो.

इराकमधील पाश्‍चिमात्य लष्कराचे प्रवक्ते कर्नल वेन मॅरोटो यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी अमेरिकेच्या ‘अल बलाद’ हवाईतळावर रॉकेट हल्ले झाले. शेजारच्या दियाला प्रांतातून प्रक्षेपित झालेल्या सात रॉकेट्सपैकी पाच रॉकेट्स हवाईतळावर कोसळले. तर दोन रॉकेट्स शेजारच्या गावातील वस्त्यांवर कोसळले.

रॉकेट हल्लेयाआधी जानेवारी २०२० मध्ये बलाद हवाईतळावर इराणने रॉकेट हल्ले चढविले होते. वर्षभरापूर्वी अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. त्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराणने सदर हवाईतळावर जोरदार रॉकेट वर्षाव केला होता. त्यानंतर अल बलाद हवाईतळ अमेरिकेच्या नियंत्रणात असला तरी येथे अमेरिका किंवा पाश्‍चिमात्य देशांचे लष्कर तैनात नाही, अशी माहिती कर्नल मॅरोटो यांनी दिली.

सदर हवाईतळावर फक्त कंत्राटदार आणि खासगी अमेरिकन कंपनीचे कर्मचारी राहत होते. या हल्ल्यात जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे मॅरोटो यांनी सांगितले. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. साधारणपणे इराकमधील अमेरिकेच्या लष्करी, हवाईतळ किंवा दूतावासांवरील हल्ल्यांची जबाबदारी इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी गट किंवा ‘आयएस’चे दहशतवादी स्वीकारतात. पण गेल्या महिन्याभरात झालेल्या तीन हल्ल्यांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.रॉकेट हल्ले

गेल्या महिन्यात अमेरिकेने सिरियातील इराणसंलग्न गटांच्या तळावर हवाई हल्ले चढविले होते. त्यानंतर ३ मार्च रोजी दहशतवाद्यांनी इराकमधील अमेरिकेच्या ‘अल अस्साद’ हवाईतळावर हल्ले चढविले होते. या हल्ल्यात अमेरिकी कंत्राटदार ठार झाला होता. या हल्ल्यासाठी शियापंथियांची सशस्त्र संघटना जबाबदार असल्याचे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी म्हटले होते. पण त्यांनी थेट इराणचा उल्लेख करण्याचे टाळले होते. त्यानंतर अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराकमधील हल्ल्यांमधून इराणला क्लिन चीट देत असल्याची टीका झाली होती.

अमेरिकेने इराकमधून पूर्ण सैन्यमाघार घ्यावी, अशी मागणी इराण व इराकमधील इराणसंलग्न गट करीत आहेत. इराणचे समर्थन असलेल्या इराकमधील राजकीय पक्षांनी इराकी संसदेत यासंबंधीचा प्रस्ताव मांडला होता. अमेरिकेने इराकमधून सैन्य माघारी घेतले नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी इराणच्या लष्करी अधिकार्‍यांनी दिली होती. इराकमध्ये अमेरिकेचे २५०० जवान तैनात आहेत.

leave a reply