आखातात अस्थैर्य माजविणाऱ्या इराणच्या कारवायांमुळे सौदीच्या चिंता वाढल्या आहेत

सौदी अरेबियाचे राजे सलमान

रियाध  – ‘इराणच्या राजवटीची आखाती क्षेत्राबाबतची धोरणे सौदी अरेबियाची चिंता वाढवित आहेत`, असे सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझिझ अल सौद` यांनी बजावले. इराण जहाल पंथवादी गटांना पाठिंबा देत आहे. इराण योजनाबद्धरित्या या क्षेत्रात आपली लष्करी तैनाती करीत आहे. याबरोबरच आपल्या अणुकार्यक्रम व क्षेपणास्त्र कार्यक्रमासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाशी सहकार्य करण्यास इराण तयार नाही, ही घातक बाब ठरते, असा इशारा सौदीचे राजे सलमान यांनी दिला आहे.

सौदी अरेबियाच्या शूरा कौंसिलच्या वार्षिक बैठकीत बोलताना राजे सलमान यांनी कोरोना, येमेनमधील संघर्ष रोखण्यासाठी सौदी करीत असलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले. तर इराण तसेच लेबेनॉनमधील इराणसमर्थक हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या कारवाया आखातात अस्थैर्य माजवित असल्याची टीका राजे सलमान यांनी केली. ‘इराण आपल्या भूमिकेत बदल करील, अशी आशा आहे. इराण आपली नकारात्मक धोरणे सोडून चर्चा आणि सहकार्याद्वारे वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेईल`, अशी अपेक्षा असल्याचे राजे सलमान म्हणाले.

आखातातील अस्थैर्याला इराण जबाबदार असून यावर राजे सलमान यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, येमेनमधील हौथी बंडखोर आणि इराकमधील हश्‍द या दहशतवादी गटांचे समर्थन करून इराण या क्षेत्रात अस्थैर्य निर्माण करीत असल्याचा ठपक राजे सलमान यांनी ठेवला. तर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या चर्चेबाबत इराणने स्वीकारलेल्या भूमिकेवर राजे सलमान यांनी टीका केली. व्हिएन्ना येथील वाटाघाटींमध्ये इराण सहकार्य करीत नसल्याचे राजे सलमान म्हणाले. अणुकार्यक्रमाचा वाद सोडविण्यासाठी इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला सहकार्य करावे, असे आवाहन सौदीच्या राजांनी केले.

सौदीच्या चिंतायाआधीही सौदी अरेबिया, युएई आणि इतर अरबमित्रदेशांनी इराणवर आखातात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला होता. पण व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतची चर्चा पुन्हा एकदा स्थगित झाली आहे. यासाठी सौदीच्या राजांनी इराणला जबाबदार धरले असून यामुळे सौदीने इराणविरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे. शूरा कौंसिलच्या वार्षिक बैठकीत राजे सलमान यांनी इतर मुद्यांबरोबर इराणपासून असलेल्या धोक्याला महत्त्व देऊन पुढील वर्षातील सौदीचे धोरण स्पष्ट केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, सौदीचे राजे सलमान यांनी आखातातील अस्थैर्यासाठी इराणला जबाबदार धरुन काही तास उलटत नाही तोच, येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी व अरब मित्रदेशांच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला. येमेनच्या श्‍वाबा प्रांतात झालेल्या या हल्ल्यात चार जवान मारले गेल्याचा दावा केला जातो. हौथी बंडखोरांकडून सुरू असलेल्या या हल्ल्यांना सौदी व अरब मित्रदेशांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

leave a reply