‘मुस्लिम ब्रदरहूड’वर टीका करण्याचे टाळणार्‍या धर्मगुरुंवर सौदीची कारवाई

रियाध – सौदी अरेबियाच्या सर्वोच्च धार्मिक संघटनेने दिलेल्या आदेशांकडे दुर्लक्ष करणार्‍या व ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या कट्टरपंथीय संघटनेवर टीका टाळणार्‍या १०० हून अधिक धर्मगुरुंवर सौदीच्या सरकारने कारवाई केली. सौदीच्या सरकारने ‘मक्का’ आणि ‘अल-कासिम’ या दोन शहरातील या शंभरहून अधिक धर्मगुरुंना त्यांच्या पदावरुन काढून टाकले आहे. सौदी अरेबियाच्या दैनिकाने ही माहिती प्रसिद्ध केली.

काही आठवड्यांपूर्वी सौदीच्या ‘काऊन्सिल ऑफ इस्लामिक स्कॉलर्स’ या सर्वोच्च धार्मिक संघटनेने ‘मुस्लिम ब्रदरहूड’ला दहशतवादी संघटना घोषित केले होते. ‘मुस्लिम ब्रदरहूड’ची शिकवण मान्य करण्यासारखी नाही. ही संघटना तरुणांना दहशतवादाकडे नेत आहे. ब्रदरहूडमुळे तरुण हिंसाचाराकडे वळत आहेत, अशी टीका सौदीच्या धार्मिक संघटनेने केली होती. सौदीच्या प्रार्थनास्थळांमध्ये ‘मुस्लिम ब्रदरहूड’च्या विचारांवर बंदी टाकण्यात यावी, या दहशतवादी संघटनेवर टीका करावी, असे आदेश सौदीच्या धार्मिक संघटनेने सर्व धर्मगुरुंना दिले होते.

आठवड्यातील एक दिवस जाहीरपणे ‘मुस्लिम ब्रदरहूड’ दहशतवादी संघटना असल्याचे सांगून या संघटनेच्या विचारांपासून दूर रहा, असे आवाहन करण्याची सूचना सौदीच्या धार्मिक संघटनेने दिली होती. याचे तपशीलवार पत्रकही देशातील प्रार्थनास्थळांना देण्यात आले होते. पण या आदेशानंतरही शंभरहून अधिक धर्मगुरुंनी ‘मुस्लिम ब्रदरहूड’वर टीका करण्याचे टाळले होते. त्यामुळे सौदी सरकारमधील ‘मिनिस्ट्री ऑफ इस्लामिक अफेअर्स, कॉल अँड गायडन्स’ या विभागाने संबंधित धर्मगुरुंना पदावरुन काढून टाकले आहे.

दरम्यान, या कारवाईसह सौदी अरेबियाने ‘मुस्लिम ब्रदरहूड’बाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. यापुढे सौदीमध्ये ब्रदरहूड समर्थकांची गय केली जाणार नसल्याचे संकेत सौदीने आपल्या या कारवाईने दिल्याचे दिसत आहे.

leave a reply