चीनवर नजर ठेवण्यासाठी अमेरिका भारताला सहाय्य करीत आहे

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा दावा

वॉशिंग्टन – लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनचे पन्नास हजार सैनिक एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. गेल्या सात महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका भारताला सहाय्य करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. विशेषतः चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारताला अमेरिका फार मोठे सहाय्य करीत असल्याचा दावा अमेरिकेच्या ‘एशिया पॅसिफिक एअर फोर्स’चे प्रमुख जनरल केनिथ विल्सबॅक यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये पार पडलेल्या ‘बेका’ करारामुळे हे सहजशक्य झाल्याचा निर्वाळा जनरल विल्सबॅक यांनी दिला आहे.

काही महिन्यांपूर्वी भारत आणि अमेरिकेमध्ये ‘बेसिक एक्सचेंज कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट-बेका’ हा करार संपन्न झाला होता. यानुसार दोन्ही देश एकमेकांना आवश्यक त्या गोपनीय माहितीचे आदानप्रदान करू शकतात. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेले सहाय्य पुरविणेही दोन्ही देशांना या करारामुळे शक्य झाले आहे. भारत व अमेरिकेमध्ये विकसित होत असलेल्या संरक्षणविषयक सहकार्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून या कराराकडे पाहिले जाते. कारण यामुळे अत्यंत संवेदनशील गोपनीय माहिती भारताला अमेरिकेकडून मिळू शकते. यामुळे आपल्यावर हल्ला चढविणार्‍या शत्रूची संपूर्ण माहिती व त्याची अचूक स्थिती भारतीय संरक्षणदलांना मिळू शकते. यामुळे हल्ला चढवून या धोक्याचे निराकरण करणे भारतीय संरक्षणदलांसाठी अत्यंत सोपे जाऊ शकते.

अशी संवेदनशील माहिती अमेरिका भारताला पुरवू लागली असून ‘बेका’ कार्यान्वित झाल्याचे जनरल विल्सबॅक यांनी उघड केले. नोव्हेंबर महिन्यात त्यांनी याबाबत सूचक विधान केले होते. ही बाब आत्ता उघड झाली असून यामुळे चीनच्या विरोधात अमेरिका भारताला सक्रीय सहाय्य करीत असल्याचे समोर येत आहे. याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबरोबरील सीमावादात अमेरिका भारताच्या बाजूने उभी असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. तसेच इतर अमेरिकन नेते व लष्करी अधिकारी देखील आपला देश भारताच्या बाजूने उभा असल्याचे वारंवार सांगत आहेत.

अमेरिकेच्या या सहकार्यामुळे भारताची बाजू अधिकच भक्कम झाल्याचेही संकेत मिळू लागले आहेत. ही चीनसाठी फार मोठ्या चिंतेची बाब ठरते. पाकिस्तानला हाताशी धरून चीन भारताला एकाच वेळी दोन आघाड्यांवर संघर्ष करण्यास भाग पाडू शकेल, अशा धमक्या चीनकडून दिल्या जात होत्या. मात्र भारताने त्याची पर्वा न करता सीमावादात चीनच्या विरोधात कणखर भूमिका घेतली आहे. याचे पडसाद पाकिस्तानातही उमटत आहेत. भारताला अमेरिकेकडून मिळत असलेल्या सहाय्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला सहन करावे लागतील, असा इशारा या देशाचे सामरिक विश्‍लेषक देऊ लागले आहेत.

leave a reply