‘तेहरिक-ए-तालिबान’ची पाकिस्तानला भीषण दहशतवादी हल्ल्यांची धमकी

- तेहरिकने संघर्षबंदी मोडल्याचे जाहीर केले

दहशतवादी हल्ल्यांची धमकीपेशावर – ‘पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर यापुढे विश्‍वास ठेवता येणार नाही. संघर्षबंदी संपुष्टात आली असून पाकिस्तानी लष्करावर हल्ले सुरू करण्यासाठी तयार रहा’, असा संदेश ‘तेहरिक-ए-तालिबान’चा नेता नुर वली मेहसूद याने आपल्या दहशतवाद्यांना दिला. यामुळे पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे नवे सत्र सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून पाकिस्तानातील ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. तेहरिकच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे जवान मारले जात होते. तेहरिकचे हे हल्ले थांबविण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने अफगाणिस्तानातील तालिबानला आवाहन केले होते. सुरुवातीला तालिबानने हा पाकिस्तानचा अंतर्गत मामला असल्याचे सांगून पाकिस्तानला चर्चेद्वारे ही समस्या सोडविण्याचा सल्ला दिला होता. पण ऑक्टोबर महिन्यात तालिबानने पाकिस्तान सरकार व तेहरिक मध्ये मध्यस्थी करून महिन्याभरासाठी संघर्षबंदी घडवून आणली.

९ नोव्हेंबरपासून ही संघर्षबंदी लागू झाली होती. संघर्षबंदीसाठी पाकिस्तानच्या सरकारने तेहरिकच्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांची सुटका करण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर तेहरिकच्या भागात पाकिस्तानच्या लष्कराने पाय देखील ठेवू नये, ही मागणीही पाकिस्तानच्या सरकारने मान्य केली होती. पण ९ डिसेंबरपर्यंत पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने आपल्या मागण्या पूर्ण केल्या नसल्याचे सांगून तेहरिकचा प्रमुख नुर वली मेहसूद याने त्यावर संताप व्यक्त केला.

आपल्या केवळ बारा साथीदारांचीच सुटका केल्याची टीका तेहरिकने एका पत्रकातून केली. त्याचबरोबर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी डेरा इस्माईल खान, लक्की मरवात, स्वात, बजौर, स्वाबी आणि उत्तर वझिरीस्तानातील तेहरिकच्या ठिकाणांवर कारवाई करून आपल्या साथीदारांना ठार केल्याची माहिती या पत्रकात आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराची ही कारवाई संघर्षबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. यापुढे तेहरिकचे दहशतवादी वाटेल तिथे पाकिस्तानी लष्करावर हल्ले चढवू शकतात, असे तेहरिकचा प्रमुख मेहसूदने जाहीर केले.

दहशतवादी हल्ल्यांची धमकीयामुळे पाकिस्तानातील तेहरिकच्या हल्ल्यांची शक्यता वाढली असून पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने देशाची सुरक्षा धोक्यात टाकल्याची टीका होत आहे. पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा, वझिरीस्तान, बजौर, दीर या भागांमध्ये तेहरिकचे वर्चस्व आहे. पाकिस्तानातील लोकशाही आपल्याला मान्य नसून पेशावरपर्यंत आपला कायदा लागू करण्याची धमकी तेहरिकने याआधी केली होती. तेहरिकच्या या घोषणेला पाकिस्तानातील कट्टरपंथियांचे समर्थन मिळाले होते.

दरम्यान, संघर्षबंदीतून बाहेर पडलेली तेहरिक येत्या काळात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेबरोबरच चीनच्या प्रकल्पांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या दासू येथे चिनी कर्मचार्‍यांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे तेहरिक असल्याचे उघड झाले होते. पुढच्या काळात असे हल्ले चढवून तेहरिक पाकिस्तानला जेरीस आणणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानातील अस्थैर्य वाढून हा देश अराजकाच्या खाईत लोटला जाईल. अण्वस्त्रसज्ज असलेल्या पाकिस्तानातील ही परिस्थिती शेजारी देशांसह जागतिक सुरक्षेसाठीही धोकादायक असल्याचे समोर येत आहे. कारण तेहरिक सारखी खतरनाक दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर नजर ठेवून असल्याचे याआधी उघड झाले होते.

leave a reply