सौदीने राजधानी रियाधवरील हौथींचे क्षेपणास्त्र हल्ले भेदले

रियाध/सना – येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. या कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण या हल्ल्यानंतर खवळलेल्या अरब देशांच्या आघाडीने हौथी बंडखोरांविरोधात भीषण हल्ले चढविणार असल्याची घोषणा केली.

सौदीने राजधानी रियाधवरील हौथींचे क्षेपणास्त्र हल्ले भेदलेसोमवारी संध्याकाळी हौथी बंडखोरांनी रियाधच्या दिशेने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. सौदी अरेबियाच्या संरक्षणदलाने हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर करून ही क्षेपणास्त्रे रियाधवर आदळण्याआधीच नष्ट केली. या कारवाईत एका क्षेपणास्त्राचे तुकडे एका घरावर कोसळल्याची माहिती सौदीच्या माध्यमांनी दिली.

या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर हौथी बंडखोरांनी सौदीच्या दक्षिणेकडील लष्करी तळांवर ड्रोनचे हल्ले चढविले. पण सौदीने हौथी बंडखोरांचे हे प्रयत्नही हाणून पाडले. या दोन्ही घटनांनंतर सौदी व अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हौथी बंडखोरांना इशारा दिला. आत्तापर्यंत अरब मित्रदेशांच्या लष्करी आघाडीने हौथी बंडखोरांवर हल्ले चढवताना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचा आदर राखला होता. सौदीने राजधानी रियाधवरील हौथींचे क्षेपणास्त्र हल्ले भेदलेपण आमच्या शहरांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागणार्‍या हौथी बंडखोरांवर यापुढे हल्ले चढविताना कुठल्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाणार नसल्याचे अरब देशांच्या लष्करी आघाडीने बजावले. यानंतर मंगळवारी सकाळी अरब देशांच्या लढाऊ विमानांनी हौथींच्या ठिकाणांवर हल्ले चढविल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, इराण तसेच इराणसमर्थक हौथी बंडखोरांविरोधात अरब देशांचे सहकार्य भक्कम करण्यासाठी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सोमवारपासून अरब देशांचा दौरा सुरू केला आहे. अशा परिस्थितीत, रियाधवरील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर अरब देशांची लष्करी आघाडी अधिकच मजबूत झाली आहे.

leave a reply