सौदी इस्रायलकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत

- इस्रायली मासिकाचा दावा

हवाई सुरक्षा यंत्रणातेल अविव – सौदी अरेबिया इस्रायलकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांचे क्षेपणास्त्र हल्ले उधळण्यासाठी सौदीला हवाई सुरक्षा यंत्रणेची आवश्यकता आहे. अमेरिकेने पॅट्रियॉट यंत्रणा काढून घेतल्यामुळे सौदीच्या हवाई सुरक्षेला असलेला धोका वाढला असून यासाठी सौदीने इस्रायलशी संपर्क साधल्याचा दावा इस्रायली मासिकाने केला.

२०१९ साली हौथी बंडखोरांनी सौदीच्या इंधन प्रकल्पांवर रॉकेट तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले वाढविले होते. त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीमध्ये तातडीने पॅट्रियॉट यंत्रणा तैनात केली होती. पण गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेने सौदी अरेबियातील ‘टर्मिनल हाय अल्टिट्युड एअर डिफेन्स-थाड’ तसेच ‘पॅट्रियॉट’ या दोन प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा सौदीतून काढून घेतल्या आहेत. यामध्ये सौदीची राजधानी रियाधमधील प्रिन्स सुल्तान हवाईतळावर तैनात पॅट्रियॉटचा समावेश आहे.

या यंत्रणा काढल्यामुळे सौदीची हवाई सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा केला जातो. याचा फायदा घेऊन येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर सौदीवर नवे हल्ले चढवतील, अशी भीती व्यक्त केली जाते. या पार्श्‍वभूमीवर, आपली हवाई सुरक्षा भक्कम करण्यावर सौदी गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी सौदी रशिया तसेच इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेचा विचार करीत असल्याची माहिती इस्रायली सूत्रांनी दिली.

इस्रायलच्या सर्वात यशस्वी ‘आयर्न डोम’ आणि ‘बराक ईआर’ या दोन हवाई सुरक्षा यंत्रणांबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे इस्रायली लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. इस्रायली मासिकाने केलेल्या या दाव्यावर इस्रायल तसेच सौदीने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इराणच्या सरकारी माध्यमांनी या बातमीची दखल घेतली आहे.

leave a reply