कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मानवता संपुष्टात येईल

- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू

जेरूसलम – चीनमध्ये कोरोनाव्हायरसची दुसरी लाट आली असून या साथीचे किमान ८३६ रुग्ण चीनमध्ये आढळल्याची बातमी चीनच्याच माध्यमांनी दिली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. ‘कोरोनाची ही दुसरी लाट मानवता संपुष्टात आणेल’, असा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इस्रायली संसदेत आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर बोलताना हा इशारा दिल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायलमध्ये कोरोनाने २४५ जणांचा बळी घेतला असून या देशात या साथीचे १६,४४४ रुग्ण आहेत. ही मोठी संख्या असून आपल्या सरकारमधील प्रत्येक नेत्याने कोरोनाचे संकट काळजीपूर्वक हाताळावे, अशी सूचना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली आहे. ही सूचना करीत असताना, पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी पक्षनेत्यांना सावध केल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

‘कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या विषाणूची पुन्हा लागण होत असल्याचे परदेशातून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीतून स्पष्ट होते. ही माहिती खरी असेल तर या साथीच्या दुसऱ्या लाटेने मानवता संपुष्टात येईल’, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने म्हटले आहे. याआधीही इस्रायली पंतप्रधानांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली होती. पण इस्रायली पंतप्रधानांचा आत्ताचा इशारा अधिक चिंताजनक असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

मात्र, नेत्यान्याहू सरकारमधील नेत्यांनी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या या बातमीचा इन्कार केला. पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी या शब्दांचा वापर केला नव्हता, असे या नेत्यांनी म्हटले आहे. याउलट ‘या महामारीमुळे जगभरात अराजक माजेल’, असे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती या नेत्याने दिली.

चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचा दावा केला जातो. पण आधीप्रमाणेच चीन याबाबतची माहिती दडवित असल्याचा आरोप जोर पकडू लागला आहे. ब्रिटन, स्पेनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या साथीच्या दुसऱ्या लाटेविषयी इशारे दिले होते.

leave a reply