लिबियात सात भारतीयांचे अपहरण

नवी दिल्ली/त्रिपोली – लिबियात सात भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. गेल्या महिन्यात या सात भारतीयांचे त्रिपोली विमानतळावर जात असताना अश्वरीफ येथून अपहरण झाले. या सात भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय- लिबीयाचे अधिकारी यासंदर्भांत सतत संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे.

१४ सप्टेंबर रोजी हे सात भारतीय मायदेशी परतण्यासाठी त्रिपोली विमानतळावर जात असताना अश्वरीफ भागातून त्यांचे अपहरण झाले. अपहरण झालेले भारतीय आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. या सात जणांच्या सुटकेसाठी ट्युनिशियातील भारतीय दूतावासातील अधिकारी पाठपुरावा करीत आहे.

दूतावासाकडून लिबिया सरकार आणि आंतरराष्ट्रीय संघटनाशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. अपहरणकर्त्यांनी सात भारतीयांच्या मालकांशी संपर्क साधण्यात आला आहे. हे सर्व भारतीय सुखरूप आहेत. तसेच आम्ही या अपह्रत भारतीयांच्या कुटुंबियांशी संपर्कात असून या सातही जणांना सुरक्षित आणि सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती श्रीवास्तव यांनी दिली आहे. दरम्यान या भारतीयांचे अपहरण कोणी केले याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

अरब स्प्रिंगच्या लाटेत २०११ साली मुअम्मर गद्दाफीची राजवट कोसळल्यापासून अस्थिरता आहे. येथील गृहयुद्धात प्रचंड हिंसाचार सुरु आहे. सप्टेंबर २०१५ साली लिबियातील संघर्ष पाहून भारत सरकारने भारतीयांना लिबियात न जाण्याची ॲडव्हायजरी जारी केली होती. यानंतर २०१६ मध्ये लिबियातील परिस्थिती अधिकच चिघळल्यानंतर भारताने लिबियात जाण्यासाठी प्रवासी निर्बंध घातले. हे निर्बंध अजूनही कायम आहेत. लिबियात भारतीयांचे अपहरण करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१५ साली देखील चार भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते आणि काही महिन्यानंतर त्यांची सुटका झाली होती.

leave a reply