मनाली-लेह महामार्गावरील सर्वात लांब पोलादी पूलाचे काम पूर्ण

चंदीगड – व्यूहरचनात्मकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असलेल्या मनाली – लेह महामार्गावरील हिमाचल प्रदेशमधील सर्वात लांब पूलाचे काम पूर्ण झाले आहे. या महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. मनाली-लेह महामार्गावर उभारण्यात आलेल्या या पुलाला बार्सी पूल असे नाव देण्यात आहे.

लडाखमधील दौलत बेग ओल्डी येथे श्योक नदीवर उभारण्यात आलेल्या कर्नल च्वांग रिंचन सेतू नंतर हा देशातील हा दुसरा सर्वात लांब पूल आहे. हिमाचल प्रदेशच्या डारचा येथे भागा नदीवरील ३६० मीटर लांबीचा हा पूल उभारण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला. खराब वातावरणासहा अन्य समस्यांमुळे पुलाच्या बांधकामासाठी १० वर्षे लागल्याचे बीआरओच्या सूत्रांनी सांगितले.

प्रशासकीय कारणांमुळे पुलाचे काम काही काळ थांबविण्यात आले होते. वास्तविक पुलाच्या बांधकामाला चार वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. मागील काही काळात या कामाला वेग आला होता. हा पूल बनवण्यासाठी पोलादाचा वापर करण्यात आला आहे. याच मार्गावर येथून जवळच १०० मीटर लांबीचा दुसरा पूल उभारण्यात आला असून तो ‘अटल टनेल’ला जोडतो. या पूर्वी नदीवर एक छोटा जुना पूल होता. मात्र पावसात नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मनालीतून लेहपर्यंत सैन्याची वाहतूक सुलभ करण्यासाठी भारताने नवा महामार्ग तयार केला आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होईल. या नव्या २८० किमी. च्या रस्त्यामुळे लेहपर्यंत लष्करी तुकड्या, शस्त्र तसेच इतर आवश्यक साहित्य यांचा पुरवठा वेगाने करणे सोपे होणार आहे. त्यामुळे या महामार्गावरील पुलाचे काम पूर्ण होणे महत्वाचे ठरते.

 

leave a reply