२०१७ सालच्या रेल्वे स्फोटाप्रकरणी ‘आयएस’शी संबंधित सात दहशतवाद्यांना फाशी

नवी दिल्ली – २०१७ साली भोपाळ-उज्जैन पॅसेंजर रेल्वेत घडविण्यात आलेल्या स्फोटाप्रकरणी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित सात दहशतवाद्यांना बुधवारी ‘एनआयए’ न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय दुसऱ्या एका प्रकरणात ‘आयएस’शी संबंधित दोघा दहशतवाद्यांना गुजरातच्या ‘एनआयए’ न्यायालयाने १० वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

Seven IS-linked terroristsमार्च २०१७ सालात भोपाळ-उज्जैन गाडीमध्ये मध्य प्रदेशातील शाजापुरमध्ये जबरी स्थानकाजवळ एक स्फोट झाला होता. या स्फोटात दहा जण जखमी झाले होते. तपासात हे दहशतवादी कृत्य असल्याचे लक्षात आले होते. या पॅसेंजर गाडीमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. मोठा घातपात घडविण्याचा कट होता. मात्र दहशतवाद्यांना अपेक्षित तीव्रतेचा स्फोट झाला नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र तपासात भयंकर सत्य समोर आले.

त्यावेळी सिरिया, इराकमध्ये प्रचंड हिंसाचार माजवीत असलेल्या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली येऊन भारतातही तसेच घातपात घडविण्याची योजना आखण्यात आल्याचे उघड झाले. देशाबाहेरील ‘आयएस’च्या हस्तकांच्या संपर्कात राहून भारतात दहशतवादी कारवाया करणारे एक मॉड्यूल तपासात उघड झाले. स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी गुप्तचर यंत्रणांकडून व इतर तपास संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर उत्तर प्रदेश पोलिसांनी एक ऑपरेशन करीत लखनऊमध्ये स्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी सैफ्फुल्लाह नावाच्या एका दहशतवाद्याला ठार केले. एका घरात दहशतवादी लपून बसला होता. या घरात प्रचंड प्रमाणात स्फोटके व शस्त्र सापडली. पुढील तपासात आणखी आठ जणांना अटक करण्यात आली.

न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये हे सर्व दहशतवादी दोषी ठरले होते. देशाविरोधात कारवाया करण्यात येत होत्या ही बाब पुराव्यानिशी न्यायालयात सिद्ध झाली. यातील सात जणाना फाशी, तर एकाला जन्मठेप देण्यात आली आहे. २०१६ सालापासून त्याच्या या कारवाया सुरू होत्या. चकमकीत मारला गेलेला सैफुल्लाह हा पाकिस्तानमधील हस्तकाच्या संपर्कात होता. तसेच दोघेजण अवैध मार्गाने बांगलादेशात जाऊन आल्याचे लक्षात आले.

तसेच गुजरातमधील एका प्रकरणात आयएससाठी तरुणांची भरती करणाऱ्या आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या दोन भावांना एनआयए न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे. वसिम आरीफ रमोडिया उर्फ निंजा फॉक्स आणि नईम आरीफ नमोडीया उर्फ एनडी अशी या दोघा भावांची नावे आहेत. राजकोटमध्ये राहणाऱ्या या दोघांना एका प्रार्थनास्थळावरही हल्ल्याची योजना आखली होता. तसेच आयईडी हल्ला घडविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

leave a reply