कोरोनाच्या साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील अपघातामध्येच

अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’च्या प्रमुखांची माहिती

China's Wuhan laboratoryवॉशिंग्टन – ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे जैविक धोक्यांकडे बारकाईने लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचा स्वतंत्र गट आहे. हा गट जैविक घटक चुकीच्या हातात पडतात का यावर नजर ठेवतो व त्यात प्रतिस्पर्धी देशांचाही समावेश होतो. इथे आपण चीन सरकारचे नियंत्रण असणाऱ्या प्रयोगशाळेत झालेल्या संभाव्य लीकबाबत बोलत आहोत. या घटनेने लक्षावधी अमेरिकी नागरिकांचे बळी घेतले. संबंधित प्रयोगशाळेची उभारणी याच हेतूने करण्यात आली होती. एफबीआयच्या अहवालात, कोरोना साथीचे मूळ चीनच्या वुहान प्रयोगशाळेत झालेल्या अपघातात असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे’, असा ठपका अमेरिकी तपासयंत्रणा ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी ठेवला आहे.

Wuhan laboratoryअमेरिकेने कोरोना साथीसाठी चीनला जबाबदार धरण्याची गेल्या तीन दिवसांमधली ही दुसरी वेळ ठरते. अमेरिकेच्या ऊर्जा विभागानेही आपल्या अहवालात, कोरोना विषाणूची निर्मिती व फैलाव वुहानच्या प्रयोगशाळेतूनच झाल्याचा निष्कर्ष नोंदविला होता. त्यावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतरही अमेरिकेची आघाडीची तपासयंत्रणा असलेल्या ‘एफबीआय’च्या प्रमुखांनी पुन्हा एकदा चीनला लक्ष्य केले. त्यामुळे ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरली असून कोरोना विषाणू व साथीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसत आहे.

२०१९ सालच्या अखेरीस चीनच्या वुहान शहरातून उगम पावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभरात हाहाकार उडविला होता. या साथीत जवळपास ७० लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून अद्यापही काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वटवाघूळ व इतर जंगली प्राण्यांमधून कोरोनाचा विषाणू पसरल्याचा दावा चीनने केला होता. चीनच्या या दाव्याला पाश्चिमात्य देशांमधील काही संशोधक व यंत्रणांनीही दुजोरा दिला होता. अमेरिकेचे माजी विज्ञानविषयक सल्लागार डॉ. अँथनी फॉसी यांनी चीनची बाजू उचलून धरली होती. यावरून अमेरिकेतील संसद सदस्यांनी फॉसी यांना धारेवरही धरले होते.

musk fauci tweet chinaअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे कोरोनाचा उल्लेख ‘वुहान व्हायरस’ व ‘चायना व्हायरस’ असा केला होता. सदर विषाणू व साथ चीनमधूनच फैलावल्याकडे ट्रम्प यांनी सातत्याने लक्ष वेधले होते. डेमोक्रॅट पक्ष, आघाडीची प्रसारमाध्यमे, संशोधक व सोशल मीडियाने ट्रम्प यांचे दावे उडवून लावले होते. मात्र गेल्या दोन वर्षात अमेरिकी यंत्रणांसह जगभरातील माध्यमे व गट सातत्याने कोरोनाच्या साथीमागे चीनचा हात असल्याची जाणीव करून देत आहेत. गेल्या तीन दिवसात अमेरिकेतील आघाडीच्या यंत्रणांनी दोनदा चीनकडे बोट दाखविणे याचाच भाग ठरतो.

चीनच्या वुहान प्रयोगशाळेतील माजी संशोधिका ली मेंग यान यांनीही कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेतच तयार करण्यात आल्याचा पुनरुच्चार केला. अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या राजवटीने जाणुनबुजून कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेच्या बाहेर फैलावण्यासाठी सोडून दिल्याचा आरोप केला. वुहानसारख्या सर्वोच्च सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतून विषाणू अपघाताने बाहेर जाऊच शकत नाही, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेतील आघाडीचे उद्योजक एलॉन मस्क यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये वुहान प्रयोगशाळेत कोरोना विषाणू विकसित करण्यामागे डॉक्टर फॉसी यांचा हात असल्याचे म्हटले आहे. या पोस्टवरून चीनमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी दैनिकाने मस्क यांना धमकावले आहे. मस्क यांच्या उद्योगांसाठी चीन ही आघाडीची बाजारपेठ आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा गर्भित इशारा चीनच्या दैनिकाने दिला.

leave a reply