इराणच्या बुशहर बंदरातील संशयास्पद आगीत सात जहाजे पेटली

तेहरान – इराणच्या बुशहर बंदरातील शिपयार्डमध्ये लागलेल्या आकस्मिक आगीत सात जहाजे भस्मसात झाली. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून गेल्या महिन्याभरात इराणमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद घटनांच्या मालिकेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. बुशहर शहरात इराणचा सर्वात महत्त्वाचा अणुप्रकल्प आहे. दोन आठवड्यांपूर्वी नातांझ अणुप्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीमध्ये सेंट्रीफ्यूजेसचे मोठे नुकसान होऊन इराणचा अणुकार्यक्रम पिछाडीवर पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, बुशहरमधील या आगीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

इराणच्या बुशहर बंदरातील संशयास्पद आगीत सात जहाजे पेटलीइराणच्या दक्षिणेकडील सर्वात व्यस्त बंदर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बुशहर येथील ‘देलवार कश्ती’ या जहाजनिर्मिती कारखान्यात बुधवारी प्रचंड मोठी आग भडकली. या आगीच्या भडक्यामध्ये सदर कारखान्यातील किमान सात जहाजे पूर्णपणे नष्ट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली. तर या आगीचे लोट इतके प्रचंड होते की, सदर जहाजनिर्मिती कारखाना या आगीत भस्मसात झाल्याचा दावा आखातातील काही माध्यमे करीत आहेत. गेल्या महिन्याभरात इतर घटनांप्रमाणे बुशहर बंदरात लागलेल्या आगीचे निश्चित कारण इराण सरकारने स्पष्ट केलेले नाही. पण, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे.

इराणच्या बुशहर बंदरातील संशयास्पद आगीत सात जहाजे पेटलीत्यामुळे सदर जहाजनिर्मिती कारखान्यांमध्ये इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या जहाजांचा समावेश होता का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महिन्याभरापूर्वीच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या ताफ्यात शंभराहून अधिक गस्तीनौका सामील झाल्याची माहिती व फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले होते. तेव्हा या गस्तीनौकांवर हल्ले झाल्याची शक्यता वर्तविण्यात आहे. त्याचवेळी, सदर दुर्घटना बुशहर अणुप्रकल्पापासून दूर घडल्याचे इराण सरकारने म्हटले आहे. पण इराणच्या सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या फोटोग्राफ्समध्ये सदर घटना बुशहर अणुप्रकल्पापासून काही अंतरावरच घडल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात इराणच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घडलेल्या संशयास्पद घडामोडींच्या यादीत बुशहरमधील घटनेचा समावेश केला जात आहे.

गेल्या महिन्याभरात राजधानी तेहरानपासून इराणच्या वेगवेगळ्या शहरांमधील अतिसंवेदनशील ठिकाणी आगी लागल्या किंवा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये नातांझ अणुप्रकल्पातील आग, क्षेपणास्त्र तळावरील स्फोट, तसेच रासायनिक कारखाना, वीजप्रकल्प आणि रुग्णालयांमध्ये पेटलेल्या आगींचाही समावेश आहे. यापैकी नातांझच्या अणुप्रकल्पात लागलेल्या संशयास्पद आगीसाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जात आहे. इस्रायलने सायबर हल्ले चढवून नातांझ अणुप्रकल्पात आग भडकवली व या आगीत सदर अणुप्रकल्पातील हजारो प्रगत सेंट्रीफ्यूजेस नष्ट केल्याचा आरोप आखाती माध्यमाने केला होता. या एका घटनेमुळे इराणचा अणुकार्यक्रम किमान दोन ते तीन वर्षांसाठी पिछाडीवर पडल्याचा दावाही विश्लेषकांनी केला होता.

leave a reply