पराभूत झालेल्या मालकांचे गुलाम लढू शकत नाहीत – अफगाणी सरकारला तालिबानच्या कमांडरचा इशारा

काबुल – ‘तालिबानला या पृथ्वीवरुन नष्ट करून टाकू, असे घमेंडखोर अमेरिकेला वाटले होते. पण तालिबानने अमेरिका आणि त्याच्या सहकार्‍यांना पराभूत केले. अमेरिका जेव्हा इथून पूर्ण माघार घेईल, त्यानंतर अफगाणी लष्कर पाच दिवसही टिकाव धरू शकणार नाही. पराभूत झालेल्या मालकांचे गुलाम तालिबानशी लढू शकत नाहीत’, अशी धमकी तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्ला मिसबाह याने दिली. यामुळे अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी तालिबान जबरदस्त लष्करी मुसंडी मारण्याची तयारी करीत असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसात तालिबानच्या हल्ल्यांची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली असून यामुळे सैन्यमाघारीची घोषणा करणार्‍या अमेरिकेनेही ही माघारीचा वेग कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

दोन दिवसांपूर्वी तालिबानने अफगाण-ताजिकिस्तान सीमेवरील शीर खान बंदार चौकीचा ताबा घेतला. तासाभराच्या संघर्षानंतर येथे तैनात 134 अफगाणी जवानांनी पळ काढल्याच्या बातम्या आहेत. तर काही अफगाणी जवानांनी जीवाच्या भीतीने आश्रयासाठी ताजिकिस्तान सीमा ओलांडल्याचे लष्करी अधिकार्‍याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने या हल्ल्याचे तपशील देताना, शीर खान बंदार सीमाचौकीचा ताबा यापुढे तालिबानकडेच राहील, असे जाहीर केले. तर अफगाणिस्तानच्या गझ्नी प्रांताचा ताबा घेणारा तालिबानचा वरिष्ठ कमांडर मुल्ला मिसबाह याने अफगाणी लष्कराला धमकावले. तालिबानसमोर पराभव स्वीकारून अमेरिका माघार घेत असल्याचा दावा मुल्ला मिसबाहने केला.

‘अमेरिकेच्या या सैन्यमाघारीबरोबर लवकरच अफगाणिस्तानात तालिबानची राजवट प्रस्थापित होईल. कारण ज्या दिवशी अमेरिकेची सैन्यमाघार पूर्ण होईल, त्यानंतर अफगाणी लष्कर पुढील पाच दिवसही तालिबानसमोर टिकाव धरू शकणार नाहीत’, असा दावा मुल्ला मिसबाहने केला. त्याचबरोबर तालिबानशी संघर्ष करून जीव गमावण्यापेक्षा अफगाणी जवानांनी तालिबानसमोर शरणांगती पत्करावी, असे मुल्ला मिसबाहने सुचविले.

दरम्यान, मे महिन्यापासून तालिबानने अफगाणिस्तानातील 50हून अधिक जिल्ह्यांचा ताबा घेतला व ही चिंताजनक बाब असल्याचे, राष्ट्रसंघाचे विशेषदूत डेबोरा लियॉन्स यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि नाटो लष्कराच्या माघारीच्या घोषणेनंतर तालिबानच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे लियॉन्स यांनी लक्षात आणून दिले.

तालिबानला मिळालेले यश अल्पकाळाचे असून लवकरच अफगाणी सुरक्षा यंत्रणा तालिबानच्या ताब्यात गेलेले तळ मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा दावा अफगाण सरकार करीत आहे. दरदिवशी शंभरहून अधिक तालिबानी ठार केल्याचा दावा अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रालय करीत आहे. गुरुवारी देखील हेरात प्रांतात 130 तालिबानी दहशतवाद्यांनी शरणांगती पत्करल्याचे अफगाणी यंत्रणांनी जाहीर केले. मात्र, अमेरिकेच्या माघारीनंतर पुढील सहा महिन्यात अफगाणिस्तानातील सरकार कोसळेल व अफगाणिस्तानवर तालिबानची राजवट प्रस्थापित होईल, असा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.

leave a reply