‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात चीनच्या गस्तीजहाजाने व्हिएतनामी बोटीला जलसमाधी दिली

हॉंग सॉ – सारे जग कोरोनाव्हायरसशी लढण्यात व्यस्त असताना, ही संधी साधून चीनने ‘साऊथ चायना सी’मधील आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. चीनच्या गस्तीजहाजाने पॅरासेल द्विपसमूहाजवळ व्हिएतनामची मच्छीमार बोट बुडवून आठ जणांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेने व्हिएतनामला भेट दिली होती. तेव्हा व्हिएतनामने चीनची ‘नाईन डॅश लाईन’ची व्याख्या फेटाळली होती. त्यामुळे अमेरिकी युद्धनौका या सागरी क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर चीनच्या गस्तीनौकांनी ही कारवाई केल्याचे दिसते.

व्हिएतनामी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पॅरासेल द्विपसमूहाजवळील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जमा झालेल्या व्हिएतनामी मच्छीमार बोटींवर चीनच्या गस्तीनौकांनी हल्ले चढविले. चीनच्या गस्तीनौकेच्या या हल्ल्यात व्हिएतनामी मच्छीमार बोटीला जलसमाधी मिळाली. तर आपल्या सागरी क्षेत्रात मासेमारी करीत असल्याचा आरोप करुन चीनच्या गस्तीनौकेने या बोटीवरील आठ व्हिएतनामी नागरिकांना अटक केली. तसेच या बोटीच्या बचावासाठी गेलेल्या दोन व्हिएतनामी बोटींनाही ताब्यात घेतले.

चीनच्या या हल्ल्यावर व्हिएतनामने टीका केली आहे. चीनच्या गस्तीनौकेने व्हिएतनामच्या सार्वभौम सागरी क्षेत्रात घुसखोरी करुन आपल्या नागरिकांचे अपहरण केल्याचा आरोप व्हिएतनामने केला. तसेच चीनने या नुकसानची भरपाई करावी, अशी मागणी व्हिएतनामने केली. पण चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी व्हिएतनामचे आरोप फेटाळले आहेत. उलट व्हिएतनामी मच्छिमारांचे जहाज आमच्या हद्दीत शिरून चिनी गस्ती नौकांचा पाठलाग करीत होते, असे चुनयिंग यांनी म्हटले आहे.

‘साऊथ चायना सी’च्या संपूर्ण सागरी क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचा दावा चीन करीत आहे. हा दावा या क्षेत्रातील आग्नेय आशियाई देशांवर लादून चीनने कृत्रिम बेटांची निर्मिती व त्यांचे लष्करीकरण केले आहे. चीनच्या या दावेदारीला व या क्षेत्रातील अरेरावीला व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि तैवानने आव्हान दिले आहे. गेल्या महिन्यात चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने वेबसाईटवर ‘साऊथ चायना सी’चा ‘नाईन डॅश लाईन’चा नकाशा प्रसिद्ध केला होता. यामध्ये व्हिएतनामच्या पॅरासेलसह फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्राचाही समावेश केला होता.

चीनच्या या नकाशाचा व्हिएतनामने कडक शब्दात निषेध केला होता. तसेच पॅरासेलवर आपला ऐतिहासिक आणि भौगोलिक अधिकार असल्याचे पुरावे असल्याचे सांगून व्हिएतनामने चीनची अरेरावी खपवून घेणार नसल्याचे जाहीर केले होते. याच काळात अमेरिकेच्या अजस्त्र विमानवाहू युद्धनौकेने आपल्या ताफ्यासह व्हिएतनामला भेट दिली होती. अमेरिकेच्या या युद्धनौकेने ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातून प्रवास केला होता.

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात असेपर्यंत चीनने व्हिएतनामला उत्तर दिले नव्हते. पण अमेरिकी युद्धनौका या क्षेत्रातून निघून जाताच चीनने ही कारवाई केली आहे.

leave a reply