अमेरिकेच्या बॉम्बरची उत्तर कोरियावर टेहळणी

वॉशिंग्टन/टोकियो – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्याबर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेने आपले अत्याधुनिक सुपरसोनिक बॉम्बर विमान जपाननजिक विशेष मोहिमेवर धाडल्याचे समोर आले आहे. अमेरिकेच्या हवाईदलाने याबाबत माहिती दिली आहे. किम जोंग ऊन यांचे वास्तव्य असलेल्या वोनसान या शहराजवळून अमेरिकन बॉम्बरने घिरट्या घातल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या दैनिकाकडून करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या हवाईदलाने दिलेल्या माहितीत “बी-1बी लान्सर सुपरसॉनिक बॉम्बर”ने जपाननजिक विशेष मोहीम पार पाडल्याचे सांगितले आहे. अमेरिकेतील साऊथ डाकोटामधील तळावरुन हे बॉम्बर पाठविण्यात आले होते. अमेरिकेच्या ‘३७ बॉम्ब स्क्वाड्रन’ चे कमांडर लेफ्टनंट कर्नल लिंकन कोलमन यांनी या मोहिमेबाबतचे आदेश मुख्यालयावरून आल्याचे प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले. अमेरिकेच्या मित्रदेशांना आश्वस्त करणे व शत्रू देशांना योग्य संदेश देणे हा यामागील उद्देश होता, असेही लेफ्टनंट कर्नल कोलमन यांनी म्हटले आहे.

यावेळी अमेरिकन बॉम्बरने जपानबरोबरील सरावात सहभाग घेतल्याचेही सांगण्यात आले. मात्र दक्षिण कोरियाच्या एका दैनिकाने अमेरिकन बॉम्बरने उत्तर कोरियाच्या वोनसान शहरानजिकही घिरट्या घातल्याचा दावा केला. दक्षिण कोरियाच्या लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या हवाल्याने हा दावा केल्याचे ‘डाँग-ए एल्वो’ या दैनिकाने म्हंटले आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्यावर 12 एप्रिलला शस्त्रक्रिया झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर किम जोंग ऊन उत्तर कोरियातील एका शहरात विश्रांती घेत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अमेरिकी बॉम्बरची विशेष मोहीम लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply