मुंबई, पुण्यात पुन्हा कडक लॉकडाऊन

नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) –   मंगळवारी  महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे ५५२ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातील या साथीच्या रुग्णांची संख्या ५,२१८ वर पोहोचली आहे. मुंबईतच ४१९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच  पुण्यातील एकूण रुग्णांची  संख्या ७५४ वर गेली आहे. सोमवारी राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले होते. तसेच रेड झोन मध्ये मोडणाऱ्या पुणे आणि मुंबईतही काही अंशी सवलत देण्यात आली होती. मात्र यानंतर कित्येक ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली, वाहने  मोठया संख्येने रस्त्यावर आली. मात्र यामुळे सांक्रमणचा वेग अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी मुंबई व पुण्यात दिलेल्या या सवलती राज्य सरकारला मागे घ्याव्या लागल्या आहेत.

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळले असून केंद्रीय गृह आणि आरोग्य मंत्रालयानेही मुंबईतील वाढत्या रुग्णांच्या संख्येवर आणि लॉकडाऊनच्या वाढत्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली होती. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळण्यात आला नाही, तर संक्रमण वाढण्याचा धोका असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले होते. तसेच या शहरांमध्ये एक केंद्रीय पथक पाठविण्याची घोषणा केली होती. हे पथक सोमवारी रात्री राज्यात दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबई, पुण्यातील शिथिल केलेले नियम पुन्हा मागे घेण्याची घोषणा केली आहे. 

राज्याची आर्थिक केंद्र असलेल्या या दोन्ही शहरात जीवनावश्यक गोष्टींच्या दुकानांबरोबर निवडक उद्योग, व्यापारी आस्थापनांना परवानगी देण्यात आली होती. इ-कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या वाहतुकीसही परवानगी देण्यात आली होती. मात्र सोमवारी काढण्यात आलेल्या अधिसूचनेत आता दुरुस्ती करण्यात आली आहे. 

मुंबई आणि पुण्यात यापुढे लॉकडाऊन अधिक सक्तीने राबविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईत  कोरोनारुग्ण सापडल्यावर प्रतिबंधित करण्यात आलेल्या प्रतिबंधीत भागांची संख्या ८१३ वर पोहोचली आहे. ९ एप्रिलला प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या ३८१ होती. धारावी, वरळी भागात दरोरोज नवे  रुग्ण आढळत असून धारावीतील या साथीच्या रुग्णांची संख्या १८० झाली आहे. तसेच पुण्यात रुग्ण आढळत असलेल्या १० पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच दुकानेही बंद राहणार असून केवळ सकाळच्या वेळेत दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान देशात  कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांची संख्या ६०३ वर गेली असून २४ तासात ४४ जणांचा या साथीमुळे मृत्यू झाला. तसेच रुग्णांची संख्या १९००० वर पोहोचली आहे. 

leave a reply