‘डीआरडीओ’कडून रणगाडा भेदी ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

बालासोर – ‘डीआरडीओ’तर्फे ओडिशाच्या बालासोरमध्ये संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या अँटी-टँक गाईडेड ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. लवकरच हे क्षेपणास्त्र लष्करात दाखल होणार असून ध्रुव हेलिकॉप्टरवर हे क्षेपणास्त्र बसवण्यात येईल. भारत चीन सीमेवर तणाव वाढला असताना या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे.

DRDO-missileसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे (डीआरडीओ) १५ आणि १६ जुलै रोजी ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. ”डीआरडीओ’ने या क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडीओ प्रसिद्धकरून याबाबत माहिती दिली. यापूर्वी हे क्षेपणास्त्र नाग क्षेपणास्त्र (हेलिना ) या नावाने ओळखण्यात येत होते. या क्षेपणास्त्रात आणखी काही बदल करून त्याच्या क्षमतेत वाढ करण्यात आली आहे.

‘ध्रुवास्त्र’ची मारक क्षमता ७ किलोमीटर आहे. १.९ मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्राचे वजन ४५ किलोग्रॅम आहे. हे क्षेपणास्त्र एकावेळी आठ किलो वजनाचे स्फोटके वाहून नेण्यास सक्षम असून प्रति सेकंद २४० मीटर वेगाने ते लक्ष्याचा वेध घेते. कोणत्याही रणगाड्याचा अचूक वेध घेण्याची त्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर ऑपरेटरला संपूर्ण भागाचे फोटो पाठवत राहतो. याच्या आधारे दुसरे क्षेपणास्त्र डागण्यास मदत मिळते असल्याचे सांगण्यात येते.

कोणत्याही वातावरणात आणि रात्रीच्यावेळी देखील हे क्षेपणास्त्र डागण्यात येऊ शकते. १९९० मध्ये या क्षेपणास्त्राची पहिल्यांदा चाचणी करण्यात आली होती २००१ आणि २०१६ मध्ये देखील चाचणी घेण्यात आली. त्यानंतर गेल्यावर्षी ‘डीआरडीओ’ या क्षेपणास्त्राच्या तीन चाचण्या घेतल्या होत्या. भारत चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येत आहेत. यामुळे ‘ध्रुवास्त्र’ ही लवकरात लवकर दाखल ताफ्यात करून घेण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.

leave a reply