भारत व मध्य आशियाई देशांमध्ये शिखर बैठक पार पडणार

नवी दिल्ली – कोरोनाच्या साथीचा धोका वाढल्याने मध्य आशियाई देशांचे राष्ट्रप्रमुख प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र या सोहळ्याला ते व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २७ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कझाकस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर व्हर्च्युअल चर्चा पार पडेल.

भारत व मध्य आशियाई देशांमध्ये शिखर बैठक पार पडणारपाचही मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रप्रमुखांबरोबरील भारताच्या पंतप्रधानांची ही पहिलीच शिखर बैठक ठरेल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील वाढता संवाद व सहकार्याचे प्रतिबिंब या बैठकीत उमटेल, असा विश्‍वास परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला. तसेच मध्य आशियाई देश म्हणजे भारताचा विस्तारीत शेजार असल्याचा दावाही परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात करण्यात आलेला आहे.

भारत व मध्य आशियाई देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असलेली पावले उचलण्यावर पंतप्रधान व मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा केली जाईल. याबरोबरच या क्षेत्रातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींवरही या बैठकीत विचारविनिमय पार पडेल, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले. यामुळे भारताची मध्य आशियाई देशांबरोबरील भागीदारी अधिकच दृढ होईल, असा विश्‍वास परराष्ट्र मंत्रालयाने या निवेदनाद्वारे व्यक्त केला.

गेल्याच महिन्यात भारत व मध्य आशियाई देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संपन्न झाली होती. त्याच्याही आधी भारताने आयोजित केलेल्या अफगाणिस्तानविषयक बैठकीतही मध्य आशियाई देशांनी सहभाग घेतला होता. आत्तापर्यंत भारत व मध्य आशियाई देशांचा व्यापार पाकिस्तानने अडवून धरला होता. पण इराणने आपले छाबहार बंदर या व्यापारासाठी खुले केले आहे. याचा फार मोठा लाभ भारताच्या मध्य आशियाई देशांबरोबरील व्यापाराला मिळेल. याचा फार मोठा लाभ भारताला व मध्य आशियार्ई देशांना मिळणार असून पुढच्या काळात ही अतिशय महत्त्वाची बाब ठरू शकते.

leave a reply