ओळखपत्र आणि पॉझिटिव्ह अहवाल नसला तरी संशयित रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागणार

- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

नवी दिल्ली – कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यासाठी आता ओळखपत्र व पॉझिटिव्ह अहवालाची आवश्यकता नाही. संशयित रुग्णालयांनाही कोविड रुग्णालयात दाखल करून घ्या, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. लक्षणे दिसत असूनही केवळ पॉझिटिव्ह अहवाल नसल्यामुळे रुग्णांना कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात येत होता. यामुळे कितीतरी रुग्णांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. तसेच वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांची परिस्थिती गंभीर बनत होती. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने हे दिशानिर्देश जारी केले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांवरही कोविड सेंटर्समध्ये उपचार करावेत, त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात यावे, या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. कोविड रुग्णालयांमध्ये ओळखपत्र व पॉझिटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय दाखला दिला जात नसल्याच्या घटना घडत होत्या. रुग्णांना चाचणी अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने केवळ पॉझिटिव्ह चाचणी अहवाल नसल्याची बाब रुग्णांच्या जीवावर बेतत होती. अशा कित्येक प्रकरणात रुग्णांना प्राण गमवावे लागले असून त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल आला आहे व रुग्ण पॉझिटिव्ह होता हे लक्षात आले आहे.

यासंदर्भात काही तक्रारीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला मिळाल्या होत्या. याशिवाय काही राज्यांमध्ये इतर राज्यातील रुग्णांवर उपचार नाकारण्यात येत असल्याची बाबही समोर आली होती. या सर्वांचा विचार करून नव्या धोरणात काही बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

यानुसार संशयित कोरोना रुग्णांनाही रुग्णालयात दाखल करून घ्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोविड केअर सेंटर्स, कोविड रुग्णालये अशा संशयित रुग्णांना दाखला नाकारू शकत नाहीत, असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच केवळ संबंधित राज्यातील नसल्याने उपचार नाकारण्याचा अधिकार कोणत्याही राज्यांना नाही. केवळ संबंधीत शहर, जिल्हा किंवा राज्याचा रहिवाशी नसल्याने किंवा त्याच्याकडे स्थानिक असल्याचे ओळपत्र नसल्याने उपचार मिळत नाही, असे होऊ नये, असे बजावण्यात आले आहे. त्याचवेळी दाखल करणे आवश्यक असलेल्या रुग्णांनाच दाखल करून घ्या. ज्यांचे उपचार घरातही होऊ शकतात, अशांसाठी बेड अडवून ठेवू नका, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

leave a reply