अमेरिकेने तैवानला सार्वभौम राष्ट्र म्हणून राजनैतिक मान्यता द्यावी

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांची मागणी

राजनैतिक मान्यतातैपेई/वॉशिंग्टन/बीजिंग – ‘अमेरिकेने तैवानला मुक्त व सार्वभौम राष्ट्र म्हणून राजनैतिक मान्यता द्यावी. याचा भविष्यातील तैवानच्या स्वातंत्र्याशी संबंध नाही. केवळ याद्वारे आपल्याला वास्तव मान्य करायचे आहे. तैवानच्या स्वातंत्र्याची घोषणा करायची गरज नाही कारण तो मुळातच स्वतंत्र देश आहे. या देशाचे नाव रिपब्लिक ऑफ तैवान आहे. अमेरिका सरकार व जनतेने हे राजकीय, राजनैतिक आणि सार्वभौम वास्तव मान्य करण्याची गरज आहे’, अशी मागणी अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर चीन तैवानवर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे माध्यमे व विश्‍लेषक वारंवार बजावत आहेत. त्यामुळे अमेरिकेने तैवानबरोबरील सहकार्य अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आपली विनाशिका तैवानच्या सागरी क्षेत्रात धाडली होती. अमेरिकेने नवी ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’ जाहीर केली आहे. त्यात तैवानच्या संरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. अमेरिका तैवानला स्वसंरक्षणाची क्षमता पुरविण्यासाठी सहाय्य पुरवेल, असा उल्लेखही इंडो-पॅसिफिक धोरणात आहे.

अमेरिकेचे एक शिष्टमंडळ तैवान दौर्‍यावर दाखल झाले होते. याच पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही तैवानला भेट दिली. आपल्या दौर्‍यात पॉम्पिओ यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांची भेट घेतली. त्यानंतर तैवानमधील एका अभ्यासगटात केलेल्या भाषणात त्यांनी तैवानला राजनैतिक मान्यता देण्याची मागणी केली.

राजनैतिक मान्यता

यावेळी त्यांनी तैवान ताब्यात घेणे ही गोष्ट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनवरील पकड अधिक घट्ट करणारी बाब ठरते, असा दावाही केला. पॉम्पिओ यांच्या मागणीचे तैवानमध्ये जोरदार स्वागत झाले असून अमेरिकी विश्‍लेषक व संसद सदस्यांनीही या मुद्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र चीनने पॉम्पिओ यांच्यावर तीव्र टीकास्त्र सोडले. ‘पॉम्पिओ हे माजी राजकीय नेते असून त्यांना कसलीही पत राहिलेली नाही. ते निरर्थक बडबड करीत असून त्याला कधीही यश मिळणार नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे ‘एअरफोर्स सेक्रेटरी’ फ्रँक केंडाल यांनी अमेरिकेच्या सुरक्षेला असणारे सर्वात मोठे आव्हान चीनच असल्याचा दावा केला. ‘अमेरिका लवकरच आपले सुरक्षा तसेच संरक्षणविषयक धोरण जाहीर करणार आहे. सध्या आजूबाजूला वेगवेगळ्या घटना घडत असल्या तरी सर्वात मोठे आव्हान चीनच राहिल, याबाबत दुमत नाही’, असे केलॉग यांनी सांगितले. केलॉग यांचे हे वक्तव्य समोर येत असतानाच अमेरिकेच्या हवाईदलाने जपानमधील तळावर व्यापक हवाईसराव केल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकेकडून सुरू असलेल्या या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर चीनने शुक्रवारी व्हिएतनामजवळ व्यापक नौदल सरावाची घोषणा केली आहे. हा सराव एक आठवडा सुरू राहणार असल्याचे चीनच्या नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले.

leave a reply