अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची संसदेकडे युक्रेनसाठी दहा अब्ज डॉलर्सच्या अर्थसहाय्याची मागणी

अर्थसहाय्याची मागणीवॉशिंग्टन/किव्ह – आपल्या ‘स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस’मध्ये, अमेरिका लष्कर पाठविणार नसल्याचा दावा करणार्‍या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेनसाठी अतिरिक्त अर्थसहाय्य मागण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या संसदेसमोर यासाठी नवा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यात युक्रेनसाठी १० अब्ज डॉलर्सची तातडीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला सुमारे दीड अब्ज डॉलर्सचे आर्थिक तसेच संरक्षणविषयक सहाय्य पुरविले आहे.

मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या ‘स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस’मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी युक्रेन संघर्षाच्या मुद्यावरच भर दिला होता. यावेळी त्यांनी, अमेरिका युक्रेनच्या पाठीशी ठामपणे उभी आहे अशी ग्वाही दिली होती. या ग्वाहीनुसार, बायडेन यांनी अमेरिकेच्या संसदेसमोर युक्रेनसाठी १० अब्ज डॉलर्स निधीची मागणी केली. या निधीची वापर युक्रेनला संरक्षण, आर्थिक व मानवतावादी अर्थसहाय्य पुरविण्यासाठी करण्यात येईल, असे संसदेला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. युक्रेनसह त्याच्या शेजारी देशांनाही आवश्यकतेनुसार निधी पुरविला जाईल, असे बायडेन प्रशासनाच्या प्रस्तावात सांगण्यात आले.

अर्थसहाय्याची मागणी२०२१ सालापासून अमेरिकेने युक्रेनला सुमारे दीड अब्ज डॉलर्सचे अर्थसहाय्य पुरविल्याची माहिती देण्यात आली आहे. यात गेल्या तीन महिन्यात मंजूर केलेल्या ५५ कोटी डॉलर्सच्या अर्थसहाय्याचा समावेश आहे. या सहाय्यापूर्वी २०१४ ते २०२० या कालावधीत अमेरिकेने युक्रेनला सुमारे अडीच अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविले होते. हे सहाय्य प्रामुख्याने संरक्षणविषयक असून त्यात क्षेपणास्त्रे, गस्ती नौका, बॉडी आर्मर, सशस्त्र वाहने, ड्रोन्स, स्नायपर रायफल्स यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त एक अब्ज डॉलर्सहून अधिक मानवतावादी सहाय्य पुरविल्याचेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे.

अर्थसहाय्याची मागणीमात्र रशियाने पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने युक्रेनच्या सहाय्यात मोठी वाढ करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेने रशियन बनावटीची हेलिकॉप्टर्स युक्रेनच्या संरक्षणदलांना पुरविली होती. त्यानंतर स्टिंगर व जॅव्हलिन क्षेपणास्त्रांसह अमेरिकेची जवळपास १०० टन लष्करी सामुग्री युक्रेनमध्ये दाखल झाली आहे. अमेरिकेने यापूर्वीच्या युद्धांमध्ये वापरलेली ‘ए-१० अटॅक एअरक्राफ्टस्’ची तीन स्क्वाड्रन अर्थात जवळपास ५४ लढाऊ विमाने युक्रेनला देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. अत्याधुनिक अमेरिकी रणगाडे तसेच तोफादेखील युक्रेनच्या संरक्षणदलांना मिळतील, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

रशियाने चढविलेल्या युद्धात युक्रेनच्या संरक्षणदलांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. पुढील काळातील संघर्ष युक्रेनमधील सशस्त्र गटांच्या माध्यमातून होईल, असे भाकित वर्तविले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनसाठी १० अब्ज डॉलर्स निधीची केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते.

leave a reply