अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडून रशिया व चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा

- रशियाची तीव्र नाराजी

वॉशिंग्टन/बीजिंग/मॉस्को – अमेरिका आपली गमावलेली पत पुन्हा मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर नैतिक अधिकार प्रस्थापित करेल, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. गुरुवारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी परराष्ट्र विभागाच्या मुख्यालयाला भेट देऊन आपल्या परराष्ट्र धोरणाची रुपरेषा जाहीर केली. त्यात रशिया व चीनविरोधातील पवित्रा अधिक आक्रमक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आपण ट्रम्प यांच्याप्रमाणे रशियासमोर गुळमुळीत धोरण स्वीकारणार नसल्याचे बायडेन यांनी बजावले. त्याचवेळी चीनचा उल्लेख अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असा करून मानवाधिकारांसह सर्व मुद्यांवर चीनला थेट आव्हान दिले जाईल, असा दावाही अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी केला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट पॉलिसी’ स्वीकारून चीनसह इराण, युरोपिय देश व मित्रदेशांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचवेळी ट्रम्प यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी असलेली जवळीकही वादाचा विषय ठरली होती. जागतिक आरोग्य संघटनेसह ‘पॅरिस क्लायमेट ट्रिटी’ तसेच ‘ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिप’ करारातून बाहेर पडण्याचा निर्णय आणि नाटोसह संयुक्त राष्ट्रसंघटनेचे अर्थसहाय्य रोखून धरण्याचे धोरण यामुळे अमेरिकेची महासत्ता म्हणून असलेली प्रतिमा धुळीस मिळाल्याचे दावे विरोधक तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमीवर, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बायडेन यांनी अमेरिकेला त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान पुन्हा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. गुरुवारी परराष्ट्र विभागाच्या मुख्यालयाला भेट देऊन परराष्ट्र धोरणाची रुपरेषा जाहीर करणे हे आश्‍वासन पूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या हालचालींचा भाग असल्याचे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गैरहजर राहणे यापुढे अमेरिकेला परवडणारे नाही, असे सांगून पुढील काळात अमेरिका जागतिक स्तरावरील आपल्या आघाड्या दुरुस्त करून पूर्वपदावर आणेल, अशी ग्वाही बायडेन यांनी दिली. यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीन व रशिया राहिल, असे संकेतही त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.

‘गतकाळातील नाही तर वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिका पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाशी जुळवून घेईल. रशियासारखा देश आपली लोकशाही उधळण्यासाठी हालचाली करीत आहे. अमेरिकेला आव्हान देणार्‍या चीनच्या महत्त्वाकांक्षा अधिक प्रबळ होत असून एकाधिकारशाहीचा प्रभावही वाढतो आहे. अमेरिकी नेतृत्त्वाला त्याविरोधात उभे रहावे लागेल’, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बजावले. यावेळी त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाबाबत घेतलेल्या गुळमुळीत भूमिकेवर टीकास्त्र सोडून, आपण आपल्या पूर्वसुरीप्रमाणे रशियासमोर लोळण घेणार नाही, असा दावाही केला. बायडेन यांनी रशियातील लोकशाहीवादी नेते अ‍ॅलेक्सी नॅव्हॅल्नी यांची तातडीने सुटका करावी, अशी उघड मागणीही केली.

‘चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असून त्यांच्याकडून उभ्या राहिलेल्या आव्हांनाना थेट प्रत्युत्तर दिले जाईल. आर्थिक पातळीवर चीनकडून होणारे शोषण, चीनकडून इतर देशांविरोधात करण्यात येणारी बळजबरी आणि चीनकडून मानवाधिकार, बौद्धिक संपदा व जागतिक व्यवस्थेवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आक्रमक पावले उचलली जातील’, असा इशारा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी दिला. त्याचवेळी अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी प्रसंगी चीनचे सहकार्यही घेतले जाईल, असेही बायडेन यांनी सांगितले.

रशिया व चीनच्या मुद्यांना प्राधान्य देणार्‍या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आपल्या वक्तव्यात इराणचा उल्लेखही केला नसून ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. जर्मनीतून अमेरिकी सैन्यमाघारीचा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचीही घोषणाही बायडेन यांनी केली. त्याचवेळी स्थलांतरित व निर्वासितांसाठी अमेरिकेचे दरवाजे पुन्हा एकदा खुले होत असून दरवर्षी अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांची मर्यादा १ लाख, २५ हजारांपर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर केले. ट्रम्प यांनी ही संख्या १५ हजारांपर्यंत घटविली होती.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या विधानांवर रशियाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ‘बायडेन यांचे वक्तव्य निराशाजनक आहे. त्यांनी आक्रमक भाषेत रशियाविरोधात तथ्यहीन आरोप केले आहेत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्याविरोधात वापरण्यात आलेली निर्णायक इशार्‍यांची भाषा रशियासाठी अस्वीकारार्ह ठरते. अशा लेक्चर्सकडे रशिया लक्ष देणार नाही’, या शब्दात रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी अमेरिकेला बजावले.

leave a reply