ऑस्ट्रेलियाने अफगाणींसाठी पाठविलेल्या अन्नधान्यावर तालिबानचा डल्ला

अन्नधान्यावर तालिबानचा डल्लाकॅनबेरा/काबुल – अफगाणी जनतेवर उपासमारीचे संकट ओढावले असून या देशातील मुलांचा कुपोषणाने बळी जाईल, असा इशारा आंतरराष्ट्रीय संघटना देत आहेत. याची दखल घेऊन ऑस्ट्रेलिया व इतर काही देश संयुक्त राष्ट्रसंघामार्फत अफगाणींसाठी अन्नधान्याचा साठा पुरवित आहेत. पण ही मदत गरजूंपर्यंत पोहोचत नसून तालिबानचे दहशतवादीच याची लूट करीत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही एकमेव घटना नसून याआधीही तालिबानच्या दहशतवाद्यांनी आंतरराष्ट्रीय मदतीची लूट केल्याची माहिती ऑस्ट्रेलियातील आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली.

तीन महिन्यांपूर्वी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिका, युरोपिय महासंघासह जगभरातील देशांनी अफगाणिस्तानला पुरविण्यात येणारे सहाय्य रोखले होते. पाकिस्तान, चीन, तुर्की व अन्नधान्यावर तालिबानचा डल्लाकतार हे मोजके देश तालिबानच्या राजवटीशी संपर्कात असून सर्वप्रकारचे सहाय्य पुरवित आहेत. पण यामुळे सर्वसामान्य अफगाणींची समस्या सुटलेली नाही. याउलट आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानची मदत रोखल्यामुळे येथील जनतेची अवस्था बिकट बनल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघ व संलग्न संघटना करीत आहेत.

सुमारे सव्वा दोन कोटींहून अधिक अफगाणींवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये अफगाणींपर्यंत सहाय्य पोहोचले नाही तर या देशातील मुले कुपोषणाचे सर्वात पहिले बळी ठरतील, असा इशारा ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम-डब्ल्यूएफपी’ने दिला होता. अफगाणिस्तान सध्या आपत्तीच्या उंबरठ्यावर असून आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रतिसाद दिला नाही तर मोठा अनर्थ घडेल’, असे डब्ल्यूएफपीचे संचालक डेव्हिड बेस्ली यांनी बजावले आहे.

आंतरराष्ट्रीय संघटनांच्या या आवाहनाला ऑस्ट्रेलियाने प्रतिसाद देऊन गेल्या महिन्यात अफगाणींसाठी ३.७ टन इतके पिठ रवाना केले होते. याचा पुरवठा अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बडाखशान प्रांतातील स्थानिकांसाठी करण्यात आला होता. पण तालिबानच्या दहशतवाद्यांनी बंदूकीच्या धाकावर या सहाय्यावर डल्ला मारला आणि अफगाणी जनतेच्या तोंडचा घास हिरावून घेतला. मानवतावादी सहाय्य लुटून तालिबानचे दहशतवादी पसार झाल्याची बातमी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. डब्ल्यूएफपीच्या अफगाणिस्तानातील प्रवक्त्या शेली ठकराल यांनी तालिबानने टाकलेल्या डाक्याची कबुली दिली.

अन्नधान्यावर तालिबानचा डल्लातालिबानच्या दहशतवाद्यांनी बडाखशान प्रांतात आंतरराष्ट्रीय सहाय्याची केलेली ही पहिली लूट नाही. तर गेल्या तीन महिन्यांमध्ये तालिबानने आंतरराष्ट्रीय सहाय्य लुबाडले होते. पण बडाखशानमधील घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कहर असल्याची टीका ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने केली. बडाखशानमधील घटनेची तीव्रता मोठी असून तालिबानच्या नेतृत्वापर्यंत या घटनेचे तपशील पोहोचले. त्यानंतर तालिबानच्या दहशतवाद्यांनी काही लुटलेले पीठ परत करण्याचे आश्‍वासन दिले. पण सदर साठा अफगाणी गरजूंपर्यंत पोहोचला का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दीड महिन्यापूर्वी भारताने देखील अफगाणींसाठी ५० हजार मेट्रिक टन अन्नधान्याचा साठा तसेच वैद्यकीय सहाय्य रवाना करण्याची घोषणा केली होती. यासाठी पाकिस्तानला अट्टारी सीमेतून अफगाणिस्तानपर्यंत मार्ग पुरविण्याचा प्रस्ताव भारताने दिला होता. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने यावर निर्णय घेण्यास दीड महिन्यांचा कालावधी घेतला. त्याचबरोबर भारताच्या मानवतावादी सहाय्याला मार्ग देण्यासाठी काही शर्ती टाकल्याची माहिती समोर आली होती. पाकिस्तानच्या या अटींवर भारताने टीका केल्यानंतर पाकिस्तानने यातील काही शर्ती मागे घेतल्या. पण अफगाणिस्तानात ५० हजार मेट्रिक टन इतका गहू नेण्याची भारतीय ट्रक्सना परवानगी देण्यास पाकिस्तान अजूनही तयार झालेला नाही.

leave a reply