चीनने बांगलादेशला दिलेल्या धमकीची अमेरिकेकडून दखल

वॉशिंग्टन/बीजिंग – क्वाडमधील सहभागावरून बांगलादेशला चीनने दिलेल्या धमकीची अमेरिकेने दखल घेतली आहे. आम्ही बांगलादेशच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करतो आणि आपले परराष्ट्र धोरण राबविण्याच्या अधिकाराचा अमेरिका आदर करते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी म्हटले आहे. तर दुसर्‍या बाजूला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशाला दिलेला इशारा योग्यच असल्याचे म्हटले आहे. ‘क्वाड हे चीनविरोधात खडे ठाकलेले संघटन आहे. म्हणूनच क्वाडमध्ये सहभागी होण्याविरोधात दिलेला इशारा हा काही दुसर्‍या देशाच्या धोरणातील हस्तक्षेप ठरत नाही’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे.

धमकीची दखल‘क्वाडच्या खर्‍या हेतूची जाणीव चीनपेक्षा भारतालाच अधिक आहे. याबाबत भारतच अधिक सांगू शकेल. पण चीनला वगळून उभे राहिलेले हे क्वाड संघटन, शेजारी देशांचा वापर करून चीनलाच लक्ष्य करीत आहे. म्हणूनच क्वाडमधील सहभागाच्या विरोधात बांगलादेशला दिलेला इशारा हा काही दुसर्‍या देशाच्या धोरणातील हस्तक्षेप ठरत नाही’, असे चुनयिंग म्हणाल्या. बांगलादेशला इशारा देत असताना, क्वाडचा प्रमुख सदस्य असलेल्या भारताच्या विरोधात अशा भाषेचा प्रयोग करण्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी टाळल्याचे दिसत आहे.

बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनच्या राजदूतांनी दिलेल्या धमकीचा निषेध नोंदविला होता. त्याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगून चुनयिंग यांनी यावरही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. बांगलादेश हा चीनचा उत्तम सहकारी देश असून चीनचा शांततामय सहअस्तित्त्वावर विश्‍वास आहे, असे चुनयिंग पुढे म्हणाल्या. मात्र चीनने बांगलादेशला दिलेल्या धमकीचे पडसाद अमेरिकेपर्यंत उमटले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी पत्रकार परिषदेत आपल्या देशाने याची दखल घेतल्याची जाणीव करून दिली.

धमकीची दखलक्वाड हे अनौपचारिक, तरीही अत्यावश्यक अशी बहुपक्षीय व्यवस्था आहे. यामध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे समविचारी लोकशाहीवादी देश खुल्या व मुक्त इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी सहकार्य करीत आहेत, असे प्राईस यांनी स्पष्ट केले. अशा संघटनेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार सार्वभौम देशाला असू शकतो व त्यामध्ये इतर देश ढवळाढवळ करू शकत नाही, असे संकेत अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात येत आहेत. नेमक्या शब्दात प्राईस यांनी नोंदविलेली प्रतिक्रिया चीनच्या धमकीवर अमेरिकेने व्यक्त केलेली नाराजी ठरते. याद्वारे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, हा संदेश अमेरिकेने बांगलादेशला दिलेला आहे. तसेच चीनच्या हालचालींवर अमेरिकेची करडी नजर रोखलेली आहे, हे देखील यामुळे स्पष्ट होत आहे.

‘याआधी चीनच्या कुठल्याही राजनैतिक अधिकार्‍यांनी बांगलादेशच्या विरोधात अशा आक्रमक भाषेचा प्रयोग केलेला नव्हता. चीनच्या राजदूतांनी बांगलादेशला दिलेली धमकी ही दुर्दैवी बाब ठरते’, अशी टीका बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली होती. परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक देखील चीनने बांगलादेशला धमकी देऊन फार मोठी चूक केल्याचे सांगत आहेत. अमेरिकेसारखा देश याचा लाभ घेण्याची तयारी करीत असून यामुळे चीनने आपल्यासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ केल्याचे दिसत आहे.

leave a reply