तालिबानने मालवाहू ट्रकवरचा पाकिस्तानचा ध्वज उतरविला

- पाकिस्तानातून बचावात्मक प्रतिक्रिया

इस्लामाबाद – अफगाणिस्तानसाठी सहाय्य घेऊन जाणार्‍या पाकिस्तानच्या मालवाहू ट्रकवरचा पाकिस्तानी राष्ट्रध्वज तालिबानने उतरविला. त्याचबरोबर हा ध्वज आपण जाळणार असल्याचे तालिबानच्या दहशतवाद्याने जाहीर केले. तोर्खम सीमेवरील तालिबानच्या या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तालिबानचे समर्थन करणार्‍या पाकिस्तानातील कट्टरपंथियांचे चेहरे पांढरेफटक पडले आहेत. तर काही पाकिस्तानी पत्रकारांनी तालिबानी आपले खरे रंग दाखवू लागल्याची चिंता व्यक्त केली आहे.

तालिबानने मालवाहू ट्रकवरचा पाकिस्तानचा ध्वज उतरविला - पाकिस्तानातून बचावात्मक प्रतिक्रियाकाही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून १७ ट्रक्स अफगाणिस्तानसाठी रवाना झाले होते. अफगाणींसाठी अन्नधान्याचा आवश्यक साठा या ट्रक्समध्ये असल्याचे पाकिस्तानी यंत्रणांनी जाहीर केले होते. अफगाण-पाकिस्तानच्या तोर्खम सीमेवरुन ट्रक्सची ही वाहतूक सुरू होती. पण दोन दिवसांपूर्वी तोर्खम सीमेवर तैनात तालिबानच्या दहशतवाद्यांनी यापैकी एक ट्रक थांबवून पाकिस्तानचा ध्वज खाली उतरवला. या संपूर्ण कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या माध्यमांमध्ये चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी स्पिन बोल्दाक सीमेवर तालिबानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांना दिलेली धमकी, पाकिस्तानच्या सीमेवर केलेल्या गोळीबाराची आठवणही काही पाकिस्तानी पत्रकार काढत आहेत. तालिबानचे दहशतवादी आपल्यावरच उलटल्याची जाणीव काही पाकिस्तानी पत्रकारांना झाली आहे.

leave a reply