सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने इस्रायलचे एक अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य रोखले

वॉशिंग्टन/जेरुसलेम – अमेरिकेच्या सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन प्रशासनाने इस्रायलचे एक अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य रोखले आहे. मंगळवारी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात ‘स्पेंडिंग बिल’ मंजूर करताना हा प्रकार घडल्याचे उघड झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलचे संरक्षणसहाय्य कायम ठेवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र प्रतिनिधीगृहात घडलेल्या घटनेमुळे बायडेन यांचे संसद तसेच पक्षावर नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे.

सत्ताधारी डेमोक्रॅट पक्षातील अंतर्गत वादाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने इस्रायलचे एक अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य रोखले२०१६ साली डेमोक्रॅट पक्षाचे बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदावर असताना अमेरिका व इस्रायलदरम्यान संरक्षणसहाय्याचा नवा करार झाला होता. या करारानुसार, २०१७ ते २०२८ या १० वर्षात अमेरिका इस्रायलला ३८ अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविणार आहे. २०२० साली अमेरिकेने इस्रायलला ३.८ अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविले होते. त्यातील ५० कोटी डॉलर्स ‘आयर्न डोम’ व इतर क्षेपणास्त्र यंत्रणांसाठी होते. यावर्षी ‘आयर्न डोम’सह इतर क्षेपणास्त्रयंत्रणांना एक अब्ज डॉलर्स देण्याचे आश्‍वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून देण्यात आले होते.

यासंदर्भातील विधेयक अमेरिकेतील ‘स्पेंडिंग बिल’ला जोडण्यात आले होते. रिपब्लिकन पक्षाने ‘स्पेंडिंग बिल’ला आधीच विरोध केला होता. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व डेमोक्रॅट सदस्यांनी ‘स्पेंडिंग बिल’ला समर्थन देणे आवश्यक होते. मात्र डेमोक्रॅट पक्षातील ‘प्रोग्रेसिव्ह’ गटाने इस्रायलला देण्यात येणार्‍या संरक्षणसहाय्याला कडाडून विरोध दर्शविला. त्यामुळे ‘स्पेंडिंग बिल’ मंजूर करून घेण्यासाठी इस्रायलला देण्यात येणार्‍या सहाय्याचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. त्यानंतर ‘स्पेंडिंग बिल’ मंजूर झाले असले तरी डेमोक्रॅट पक्षातील अंतर्गत दुफळी उघड झाली आहे.

डेमोक्रॅट पक्षातील सदस्यांनी आपल्याच सहकार्‍यांवर तसेच नेतृत्त्वावर टीकास्त्र सोडले आहे. हजारो जणांचे प्राण वाचविणार्‍या यंत्रणेला राजकीय उद्देशांनी विरोध करणे ही मोठी समस्या ठरते, असा टोला डेमोक्रॅट पक्षाच्या संसद सदस्य एलिसा स्लॉटकिन यांनी लगावला आहे. तर सदस्य रिची टॉरेस यांनी इस्रायलच्या यंत्रणेला विरोध करणार्‍या आपल्या सहकारी सदस्यांच्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्रॅड श्‍नायडर यांनी, कोणत्याही परिस्थितीत इस्रायलच्या यंत्रणेला अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न करु, असे बजावले आहे.

या घटनेनंतर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी अमेरिकेतील नेत्यांशी चर्चा केली आहे. ‘स्पेंडिंग बिल’मध्ये अर्थसहाय्य मंजूर न होणे हा तांत्रिक मुद्दा असून संरक्षण विधेयकात निधीला मंजुरी मिळेल, असे अमेरिकी नेत्यांनी सांगितल्याचे परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी सांगितले.

leave a reply