भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवरून चर्चा

नवी दिल्ली – भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनने परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्यामध्ये फोनवरून चर्चा पार पडल्याचे वृत्त आहे. यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्रालयांची निवेदने देखील प्रसिद्ध झाली आहेत. वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या चर्चेत चीनने आपले लष्कर मागे घेण्याचे मान्य केले होते पण माघार घेण्याऐवजी चीनी जवानांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला, आशा थेट शब्दात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनवर विश्वासघाताचा आरोप केला.  तर चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारतीय सैनिकांनी आपल्या हद्दीत दोनदा घुसखोरी केल्याचा दावा केला आहे.India China foreign ministers

चीनच्या जवानांनी भारतीय सैनिकांवर केलेला हल्ला पूर्वनियोजित होता असे परराष्ट्रमंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वेगळ्या शब्दात परराष्ट्रमंत्रालयाने चीनवर विश्वासघाताचा आरोप केला असून याचे दोन्ही देशांच्या संबंधांवर विपरीत परिणाम झाल्याची जाणीव करून दिली आहे. राजनैतिक स्तरावर याचे परिणाम दिसुही लागले आहेत. भारत, रशिया आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची २३ जून रोजी होणारी त्रिपक्षीय व्हर्च्युअल चर्चा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हरोव यांनी ही चर्चा पुढे ढकलल्याचे जाहीर करून द्विपक्षीय संबंधांचा प्रभाव या त्रिपक्षीय चर्चेवर पडल्यावाचून राहणार नाही असे सांगून ही चर्चा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमावाद चर्चेद्वारे सोडविण्याचे मान्य करून सीमेवरील तणाव कमी करण्याची आवश्यकता असल्याची बाबही मान्य केली आहे पण, गलवान व्हॅलीतील संघर्षाचे खापर चीनने भारतीय सैनिकांवरच फोडले आहे. याद्वारे भारत देत असलेल्या इशाऱ्यांची आपण पर्वा करीत नसल्याचे चीनला दाखवून द्यायचे आहे.  त्यामुळे इतक्यात तरी चीनच्या वर्तनात सुधारण्याची शक्यता नाही. चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाने जारी केलेले निवेदन तसेच संकेत देत आहेत.

leave a reply