अमेरिका व चीनमधील तणावाने नवे शीतयुद्ध सुरू होईल

- अमेरिकेचे मुत्सद्दी हेन्री किसिंजर

वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव ही जगातील सर्वात मोठी समस्या ठरते. ही समस्या सोडविता आली नाही, तर त्यापासून सारे जग धोक्यात येईल. कारण हा तणाव कमी करण्यात अपयश आले तर अमेरिका व चीनमध्ये वेगळ्या स्वरुपाचे शीतयुद्ध सुरू होईल, असा इशारा अमेरिकेचे ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी दिला. सारी मानवता नष्ट करण्याची क्षमता आजच्या काळात मानवाने प्राप्त केलेली आहे, याकडे लक्ष वेधून किसिंजर यांनी अमेरिका व चीनमधील शीतयुद्ध जगासाठी घातक ठरू शकेल, असे बजावले आहे.

७० वर्षांपूर्वी आपण कल्पनाही केली नसेल, इतकी तंत्रज्ञानाची प्रगती झालेली आहे. आण्विक क्षमतेबरोबरच आता अतिप्रगत तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून आर्टिफिशल इंटेलिजन्समुळे यंत्र हा मानवाचा भागीदार बनला आहे व यंत्र स्वतंत्रपणे मानवासाठी निर्णय देखील घेऊ शकतो, याकडे किसिंजर यांनी लक्ष वेधले. अशा काळात जगातील क्रमांक एक व दोनच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका व चीनमधील शीतयुद्ध मानवतेला धोक्यात आणेल, अशी चिंता किसिंजर यांनी व्यक्त केली.

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात अमेरिका व सोव्हिएत रशिया या महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले होते. सोव्हिएत रशियाकडे प्रबळ लष्कर होते. पण आर्थिक सामर्थ्य नव्हते. शिवाय सोव्हिएत रशियाला आजच्या चीनइतकी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीही करता आली नव्हती. पण चीनकडे प्रगत तंत्रज्ञान आहे, लष्करी ताकद आहे आणि जबरदस्त आर्थिक शक्तीही आहे, असे सांगून किसिंजर यांनी अमेरिकेला चीनबरोबरील तणाव कमी करण्याचा सल्ला दिलेला आहे.

याआधीही किसिंजर यांनी अमेरिकेला चीनबरोबरील तणाव कमी करण्याचे सल्ले दिले होते. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी दिलेल्या या सल्ल्यावर सडकून टीकाही झाली होती. किसिंजर चीनला झुकते माप देत आहेत, असा आरोपही यानंतर सुरू झाला होता. तर अमेरिकेची सुरक्षा आणि हितसंबधांकडे दुर्लक्ष करून किसिंजर यांनी अमेरिकेचे चीनबरोबरील सहकार्य वाढविले, अशी टीका अमेरिकेचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी गेल्या वर्षी केली होती. आत्ताही किसिंजर अमेरिकेचे हितसंबंध नजरेआड करून चीनबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याचा सल्ला देत आहेत, यावर पॉम्पिओ यांनी नाराजी व्यक्त करून चीनपासून अमेरिकेला गंभीर धोका संभवतो, याची जाणीव करून दिली.

मात्र अमेरिकेत बायडेन प्रशासन सत्तेवर आल्यानंतर, अमेरिकेचे चीनबाबतचे धोरण बदलण्यास सुरूवात झाली आहे. ट्रम्प यांच्या धोरणात एकदम बदल करणे बायडेन प्रशासनासाठी अवघड बनले आहे. पण हळुहळू चीनबाबतची भूमिका सौम्य करण्यासाठी बायडेन प्रशासनो पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकेचा खरा शत्रू चीन नसून रशिया असल्याचे बायडेन प्रशासनाकडून संकेत दिले जात आहेत.

अमेरिकेला चीनपासून धोका असला तरी चीनबरोबरील युद्ध टाळता येणे शक्य आहे, असा दावा अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्री कॅथलीन हिक्स यांनी नुकताच केला होता. अशा परिस्थितीत किसिंजर यांच्यासारख्या मुत्सद्यांकडून चीनबाबत दिले जाणारे इशारे बायडेन प्रशासनाच्या चीनविषयक धोरणे व उद्दिष्टांना दुजोरा देणारी असल्याचे दिसत आहे.

leave a reply