बाल्कन क्षेत्रातील सर्बिया-कोसोवो सीमेवरील तणाव चिघळला

- सर्बियाने सीमेवरील लष्करी तैनाती वाढविली

बेलग्रेड/प्रिस्तिना – युरोपातील बाल्कन क्षेत्र म्हणून ओळखण्यात येणार्‍या भागातील सर्बिया व कोसोवोमधील तणाव चिघळण्याचे संकेत मिळाले आहेत. कोसोवो सरकारच्या नव्या नियमांविरोधात सर्बवंशिय नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनावर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर सर्बियाने आक्रमक भूमिका घेत कोसोवोच्या सीमेनजिक अतिरिक्त लष्करी तैनाती केली असून रणगाडेही रवाना केल्याचे समोर आले आहे. कोसोवोच्या राष्ट्राध्यक्षांनी यामागे रशिया व सर्बियाचा कट असल्याचा आरोप केला आहे.

बाल्कन क्षेत्रातील सर्बिया-कोसोवो सीमेवरील तणाव चिघळला - सर्बियाने सीमेवरील लष्करी तैनाती वाढविलीकाही दिवसांपूर्वी कोसोवोतील सरकारने सर्बियातून येणार्‍या तसेच सर्बियन नंबर प्लेट असणार्‍या गाड्यांना कोसोवोच्या ‘टेंपररी नंबर प्लेट’ लावणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारण्यात येईल, अशी घोषणाही केली होती. या घोषणेवर कोसोवो-सर्बिया सीमेवरील भागात राहणार्‍या सर्बवंशिय नागरिकांकडून तीव्र नाराजी उमटली. कोसोवोतील सर्बवंशियांनी याविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले. कोसोवो-सर्बिया सीमेवरील शहरांमध्ये येणारे प्रवेशमार्ग रोखून धरण्यात आले.

सर्बवंशियांचे हे आंदोलन रोखण्यासाठी कोसोवो पोलिसांनी आक्रमक कारवाई करीत अश्रुधूर तसेच रबर बुलेट्सचा वापर केला. यामुळे अधिकच भडकलेल्या सर्बवंशियांच्या गटाने दोन सरकारी कार्यालयांवर हल्ले चढवून ती जाळली. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली असून सर्बियाने आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी तसेच शनिवारी सर्बियाच्या लढाऊ विमानांनी कोसोवो सीमेनजिक भरारी घेतल्याचे समोर आले आहे. सर्बियाची लष्करी हेलिकॉप्टर्सही दिसल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. त्यापाठोपाठ शनिवारी सर्बियाने कोसोवो सीमेनजिक अतिरिक्त लष्करी तुकड्या पाठविण्यास सुरुवात केली असून त्यात सशस्त्र वाहने तसेच रणगाड्यांचा समावेश आहे.बाल्कन क्षेत्रातील सर्बिया-कोसोवो सीमेवरील तणाव चिघळला - सर्बियाने सीमेवरील लष्करी तैनाती वाढविली

कोसोवोने या सर्व हालचाली रशिया व सर्बियाचा कट असल्याचा आरोप केला आहे. ‘रशिया व सर्बियाने युरोपिय महासंघ तसेच नाटोला धक्का देण्याची योजना आखली असून आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे नीट लक्ष द्यायला हवे. सर्बियाच्या राजवटीने सर्ब वर्ल्ड उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून हा धोका ओळखून तो रोखण्यासाठी पावले उचलायला हवीत’, अशा शब्दात कोसोवोच्या राष्ट्राध्यक्ष व्हिजोसा ओस्मानी यांनी संघर्ष चिघळण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या शतकाच्या अखेरीस झालेल्या ‘बाल्कन वॉर’नंतर कोसोवो हा प्रांत सर्बियापासून वेगळा झाला होता. २००८ साली कोसोवोने स्वतंत्र देश झाल्याची घोषणा केली होती. मात्र सर्बियासह रशिया व चीनने कोसोवोला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली नाही. कोसोवो सर्बवंशियांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप सर्बियन राजवटीकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यावरून दोन देशांमध्ये छोट्यामोठ्या चकमकीही उडाल्याचे समोर आले आहे.

leave a reply