दहशतवादी, अपयशी पाकिस्तानने भारताला उपदेश देऊ नये

- मानवाधिकार आयोगात भारताचा पलटवार

अपयशीनवी दिल्ली – ‘आंतरराष्ट्रीय दहशवादाचे केंद्र, अपयशी आणि मानवाधिकार पायदळी तुडविणार्‍या पाकिस्तानसारख्या देशाच्या मानवाधिकारांवरील उपदेशांची भारताला आवश्यकता नाही. भारताच्या विरोधातील दुष्प्रचार हा पाकिस्तानच्या सवयीचा भाग बनलेला आहे. त्यासाठी पाकिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगाच्या व्यासपीठाचा गैरवापर करीत आला आहे. यासाठी पाकिस्तान मानवाधिकार आयोगाला वेठीस धरत असून परिषद हा प्रकार असहाय्यतेने खपवून घेत आहे’, अशा शब्दात भारताच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानचे वाभाडे काढले.

जम्मू व काश्मीरमध्ये भारत मानवाधिकारांचे हनन करीत असल्याचा आरोप पाकिस्तानने नुकताच केला होता. मानवाधिकार आयोगात त्याला उत्तर देताना भारताचे फर्स्ट सेक्रेटरी पवनकुमार बढे यांनी पाकिस्तानची कडक शब्दात हजेरी घेतली. मानवाधिकार आयोग व ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’मध्ये पाकिस्तानने भारतावर बिनबुडाचे आरोप केले होते. जम्मू व काश्मीरमध्ये भारत जनतेवर अत्याचार करीत असल्याचा दावा करून पाकिस्तानने या दोन्ही ठिकाणी भारताच्या विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न करून पाहिला. पाकिस्तानची माध्यमेही याला शक्य तितकी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मानवाधिकार आयोगाच्या परिषदेत बोलताना पवनकुमार यांनी पाकिस्तानच्या या दुष्प्रचाराचा समाचार घेतला. भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला असून भारताची लोकशाही प्रभावशाली आहे. अशा भारताला दहशतवादाचे केंद्र असलेल्या व मानवधिकारांच्या हननासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानासारख्या अपयशी देशाकडून मानवाधिकारांची व्याख्याने ऐकण्यात स्वारस्य नाही. आपल्याच देशातील हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि अहमदिया या अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. अल्पसंख्यांक समुदायातील हजारो महिला व मुलांचे अपहरण करून त्याचे जबरदस्तीने लग्न लावून बळजबरीने धर्मांतरण करण्याचे प्रकार पाकिस्तानात सर्रास होतात. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना अत्याचारांचा सामना करावा लागतो. धार्मिक आधावर भेदभाव व अन्याय या गोष्टी पाकिस्तानात सर्वसामान्य गणल्या जातात, अशी जळजळीत टीका भारताचे फर्स्ट सेक्रेटरी पवनकुमार यांनी केली.

असा देश भारताच्या विरोधात अपप्रचार करण्यासाठी मानवाधिकार आयोगाचा गैरवापर करीत राहतो आणि तसे करणे हा या देशाच्या सवयीचा भाग बनलेला आहे, याकडे पवनकुमार यांनी लक्ष वेधले. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केलेल्यांना पाकिस्तानकडूनच प्रशिक्षण, पैसा व शस्त्रे पुरविली जातात. हे पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची गंभीरपणे दखल घेतली जात आहे, याकडेही पवनकुमार यांनी लक्ष वेधले.

तसेच काश्मीर प्रश्‍नावर शेरेबाजी करणार्‍या ओआयसीवरही पवनकुमार यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. जम्मू व काश्मीर हा भारताचा अविभाज्य भूभाग आहे आणि इथे नाक खुपसण्याचा दुसर्‍या कुणालाही अधिकार नाही, असे पवनकुमार यांनी ओआयसीला बजावले. यासाठी पाकिस्तान ओआयसीवर दडपण टाकत असल्याचा दावा पवनकुमार यांनी केला. दरम्यान, भारताच्या विरोधात ओआयसीने काही विधाने केली असली तरी त्याने पाकिस्तानचे समाधान झालेले नाही. भारताच्या विरोधात ओआयसीने अधिक कठोर भूमिका स्वीकारावी, अशी मागणी पाकिस्तान करीत आहे. त्याऐवजी दुर्लक्ष करण्याजोगी विधाने करून ओआयसी पाकिस्तानची समजूत काढत असल्याची टीका काही पाकिस्तानी विश्‍लेषक करीत आहेत. म्हणूनच पाकिस्तानने या मुद्यावर ओआयसीतून बाहेर पडावे, अशी मागणी या विश्‍लेषकांनी केली आहे.

leave a reply