अफगाणिस्तानातील हल्ल्यासाठी भारताच्या हवाई हद्दीचा वापर करण्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या दाव्यांमुळे पाकिस्तानात खळबळ

हवाई हद्दीचा वापरवॉशिंग्टन – ‘अफगाणिस्तानात हल्ले चढविण्यासाठी अमेरिका भारताच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी, भारताबरोबर चर्चा करीत आहे. कारण कतार आणि दोहा अफगाणिस्तानपासून थोडे दूर आहेत’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्हटले होते. अमेरिकन संसदेसमोरील सुनावणीत त्यांनी केलेल्या या विधानांमुळे पाकिस्तानात घबराहट पसरली. भारत, अमेरिका व इस्रायल मिळून अफगाणिस्तानात आणि त्यानंतर पाकिस्तानात हल्ले चढविणार असल्याचे दावे काही पाकिस्तानी पत्रकारांनी ठोकले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांचे सरकार अफगाणिस्तानात आणण्यासाठी केलेली धडपड यामुळे वाया जाणार असल्याची चिंता पाकिस्तानला लागलेली आहे.

अमेरिकन संसदेच्या समितीसमोरील सुनावणीत बोलताना परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी भारताच्या वायव्येकडील हवाई हद्दीचा वापर अफगाणिस्तानातील हल्ल्यासाठी करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात भारताशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती ब्लिंकन यांनी दिली. पण याचे तपशील ब्लिंकन यांनी दिलेले नाहीत. हे दावे करीत असताना, पाकिस्तानबरोबरील संबंधांवर अमेरिका फेरविचार करीत असल्याचा सज्जड इशाराही ब्लिंकन यांनी दिला. खरोखरच अमेरिका भारताशी अशी चर्चा करीत आहे, की हा पाकिस्तानला अमेरिकेने दिलेला इशारा आहे, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेताना अमेरिकेने पाकिस्तानकडे लष्करी तळाची मागणी केली होती. पण पाकिस्तानने त्याला नकार दिला होता.

हा नकार पाकिस्तानला भलताच महाग पडेल, असे संकेत अमेरिका देत आहे. पुढच्या काळात अफगाणिस्तानात पुन्हा दहशतवादी संघटनांनी डोके वर काढलेच, तर त्यांच्यावर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेला अफगाणिस्तानच्या शेजारी देशांमध्ये तळ विकसित करावाच लागेल. अफगाणिस्तानला सीमा लागलेल्या पाकिस्तानचा वापर यासाठी अधिक प्रभावीपणे केला जाऊ शकतो. याआधी अमेरिकेने अफगाणिस्तानात तालिबानवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानातील तळांचा वापर केला होता. पण यावेळी मात्र पाकिस्तान अमेरिकेला तशी परवानगी देण्यास तयार नाही. अमेरिकेने पाकिस्तानातून अफगणिस्तानातील तालिबानवर हल्ले चढविलेच, तर तालिबान पाकिस्तानात घातपाताचे भयंकर सत्र सुरू करील, अशी चिंता पाकिस्तानला वाटत आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानात खळबळ माजविणारी माहिती उघड केली. याचे फार मोठे पडसाद उमटले असून पाकिस्तानचे पत्रकार व विश्‍लेषक यावर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत. अफगाणिस्तानात व त्यानंतर पाकिस्तानात देखील भारत, अमेरिका व इस्रायल एकजुटीने हल्ले चढविणार असल्याचे दावे काही पाकिस्तानी पत्रकारांनी ठोकून दिले आहेत. आत्तापर्यंत इस्रायलने अफगाणिस्तानातील घडामोडींवर विशेष प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. अशा परिस्थितीत ओढूनताणून इस्रायलचा अमेरिका व भारताबरोबर उल्लेख करून पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्‍लेषक हा सारा आपल्या देशाविरोधातील व्यापक कटाचा भाग असल्याचा कांगावा करू लागले आहेत.

leave a reply