चीन व दक्षिण आफ्रिकेतून कोरोनाच्या हजारो बनावट लसी ताब्यात

- कारवाई हिमनगाचे टोक असल्याचा इंटरपोलचा इशारा

जीनिव्हा/लंडन – चीन व दक्षिण आफ्रिकेत टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये कोरोनावरील बनावट लसींचे मोठे साठे ताब्यात घेण्यात आले आहेत. बनावट लसींविरोधात करण्यात आलेली ही कारवाई म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ‘इंटरपोल’ने दिला आहे. इंटरनेटवरून तसेच इतर माध्यमातून बनावट लसींची विक्री सुरू असल्याचा दावाही इंटरपोलने केला. दरम्यान, ब्राझिल व युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली असून ही धोक्याची घंटा असल्याचे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’सह आघाडीच्या संशोधकांनी बजावले आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ५६ लाखांवर गेली असून या साथीत २५ लाख ६९ हजार जणांचा बळी गेल्याची माहिती अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’ने दिली आहे. अमेरिका व ब्रिटनसह काही आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या साथीची तीव्रता घटल्याचे समोर येत आहे. यामागे सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झालेली कोरोना लसीकरण मोहीम हे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. मात्र लसीकरण मोहिमेला वेग मिळत असतानाच विविध देशांमध्ये बनावट लसींचे उत्पादन व विक्री सुरू झाल्याच्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये चीन व दक्षिण आफ्रिकेत बनावट लसींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून हजारो लसी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील कारवाईत बनावट लसींचे सुमारे अडीच हजार डोस जप्त करण्यात आले असून तब्बल ३० लाख मास्कदेखील ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी तीन चिनी व एका आफ्रिकन संशयिताला अटक करण्यात आली.

चीनमध्ये बनावट लसींचे उत्पादन करणार्‍या कारखान्यावर धाड टाकून हजारो लसी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ८० जणांना अटक केल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. ‘बनावट लसींविरोधातील कारवाई आश्‍वासक असली, तरी हे फक्त हिमनगाचे टोक आहे. गुन्हेगारी टोळ्या कोरोना लसींचे वितरण व इतर यंत्रणेला लक्ष्य करतील, असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता’, असे इंटरपोलचे प्रमुख जुर्गन स्टॉक यांनी बजावले.

इंटरपोलकडून बनावट लसींबाबत इशारा समोर येत असतानाच ब्राझिल व युरोपमध्ये कोरोनाच्या साथीची व्याप्ती पुन्हा एकदा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना साथीची तीव्रता कायम राहिली असून रुग्णांची संख्या एक कोटींवर गेली आहे. कोरोनाच्या साथीत बळी पडणार्‍यांचे प्रमाणही वाढत असून मंगळवारी १,७०० हून अधिक जण दगावल्याची माहिती देण्यात आली आहे. साथ सुरू झाल्यापासून २४ तासातील बळींचा हा उच्चांक मानला जातो. ब्राझिलमधील एकूण बळींची संख्या दोन लाख ६० हजार ९७०वर गेली आहे. कोरोनाच्या साथीमुळे ब्राझिलमधील आरोग्यव्यवस्थाही कोलमडली असून ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा असल्याचे संशोधकांनी बजावले आहे.

दरम्यान, युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या साथीची व्याप्ती वाढत असल्याचे उघड झाले आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले असून गेल्या आठवड्यात युरोपिय देशांमधील रुग्णांची संख्या १० लाखांनी वाढल्याचे निदर्शनास आणले आहे. गेले दीड महिना युरोपातील साथीची तीव्रता कमी होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य संघटनेने दिलेली माहिती लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

leave a reply